Nitesh Rane : मध्यप्रदेश, गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही आता धर्मांतर बंदी कायदा आणून महिलांना न्याय द्या, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने 15 दिवसांत अनेक मोठे निर्णय घेतले आहे. यामध्ये आरे मधील कारशेडपासून नामांतरणांपर्यंत अनेक निर्णय घेण्यात आले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही शिवसेनेतून बाहेर पडल्याचं शिंदे गटाकडून वारंवार सांगितलं जात आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडे नितेश राणे यांनी धर्मांतर बंदी कायदा आणण्याची मागणी केली आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी ट्वीट करत धर्मांतर बंदी कायदा आणण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.  


नितेश राणे यांचं ट्विट काय आहे?
आता महाराष्ट्रात भगव्याचं राज्य आहे, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरातप्रमाणे आपल्याकडेही धर्मांतर बंदी कायदा आणला पाहिजे. जेणेकरून निष्पाप महिलांना फसवून, त्यांचं धर्मांतर करून त्यांचा होणारा छळ रोखला जावा..






 धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याची गरज नसून यामुळे धर्माधर्मांमध्ये वाद होतील - आशिष शिंदे
महाराष्ट्रामध्ये धर्मांतर बंदी कायदा आणण्याच्या नितेश राणे यांनी केलेल्या ट्वीटला अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रासारख्या सहिष्ण राज्यात धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याची गरज नसून यामुळे धर्माधर्मांमध्ये वाद होतील आणि राज्यातलं एकात्मतेच वातावरण बिघडून जाईल अशी प्रतिक्रिया आशिष शिंदे यांनी एबीपी माझाला बोलताना दिली आहे. महाराष्ट्रासमोर सध्या अनेक प्रश्न आहेत त्यामुळे त्या प्रश्नावर सरकारने लक्ष केंद्रित करायला पाहिजे सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवल्या पाहिजेत धर्मांतरावरून जर कोणावर अन्याय होत असेल तर त्यावर कारवाई केली पाहिजे. याच आम्ही समर्थन करतो मात्र मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी नेत्यांनी अशी वक्तव्य करू नयेत अस सूचक वक्तव्य आशिष शिंदे यांनी केल आहे.