मुंबई: यंदाचा गणेशोत्सव, दहीहंडी तसेच मोहरम धुमधडाक्यात साजरा होणार आहे, त्यावरील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच गणेश मूर्तीच्या उंचीची मर्यादा मागे घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. गणेशोत्सव साजरी करताना आगमनाच्या रस्त्यावरचे सर्व खड्डे बुजवण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. गणेश मंडळांच्या रजिस्ट्रेशनसाठी एक खिडकी योजना राबवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Continues below advertisement


गणेशोत्सव आणि दहीहंडी साजरी करताना काही नियमावलीचं पालन करावं लागणार आहे. मुंबईतील नियमावली संपूर्ण राज्यभरात लागू करण्यात येणार आहेत. कोविडमुळे मूर्त्यांच्या उंचीवर  मर्यादा होती, ती मर्यादा यावेळी काढली आहे. तसेच मंडळ नोंदणीमध्ये सूट देण्यात आली आहे. 


सणांच्या काळात ज्यांच्यावर यासंबंधी काही छोटे-मोठे गुन्हे दाखल झाले होते, ध्वनिप्रदूषणासंबंधी ज्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले होते, त्यासंबंधीत अभ्यास करुन शक्य ते गुन्हे मागे घेण्यात येतील असं मुख्यमंत्री म्हणाले.


कोविडच्या काळात आपल्याला गणेशोत्सव साजरा करता आला नव्हता. निर्बंध असल्याने सण साजरे करण्यावर मर्यादा आल्या होत्या. यावेळी त्यावरील निर्बंध मागे घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईतील सर्व गणेशोत्सव पदाधिकांऱ्यांची आणि संघटनांची बैठक झाली. त्यावेळी हे निर्णय घेण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या सूचना पोलिसांना दिली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 


एसटी प्रशासनाला जादा गाड्या सोडण्याचे निर्देश
राज्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा  करण्यासाठी एसटी प्रशासनाला जादा गाड्या सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिवहन विभागास वाहतूक नियोजनाचे आदेश देण्यात आले आहे. प्रमुख महामार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून महामार्ग पोलिसांनाही सूचना देण्यात आले आहे.  यंदा  31 ऑगस्ट 2022 ते रविवार 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे.