मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून ओबीसी (OBC) आणि मराठा समुदायामध्ये (Maratha) दावे प्रतिदावे होत आहेत. तर, दुसरीकडे या वादाचा राजकीय फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने आता ओबीसी समाजातील रोष शमवण्यासाठी पावले उचलली आहेत. आगामी काळात ओबीसी समाजाच्या नाराजीचा फटका बसू नये, यासाठी भाजपने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. 


ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत आज भाजप ओबीसी आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत अतुल सावे यांनी महत्त्वाची आश्वासने दिलीत. यावेळी अतुल सावे यांनी सरकारकडून सुरू असलेल्या ओबीसी योजनांतील अटी व शर्थी शिथिल करणार असल्याची ग्वाही दिली. जेणेकरून ओबीसी समाजातील रोष कमी करता येईल. भाजप ओबीसी मोर्चा बैठकीत चर्चेनंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 


ओबीसी समाजातील रोष शमवण्यासाठी भाजपकडून मोर्चेबांधणी या बैठकीनंतर सुरू झाल्याची चर्चा आहे. ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी भाजपची व्यूहरचना सुरू झाली आहे. ओबीसी समाजासाठी पंतप्रधान विश्वकर्मा योजना तळागाळात राबवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 


भाजपकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक हजार विश्वकर्मा लाभार्थी तयार करणार आहेत. अशा पद्धतीने राज्यात तीन लाख लाभार्थी तयार करण्याची योजना भाजपने आखली आहे. या योजनेनुसार,  प्रत्येक लाभार्थ्याला एक ते तीन लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेतून तब्बल 300 कोटी रुपयांचा निधी वाटण्याचे भाजपचे नियोजन असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढील एका महिन्यात ही योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती आहे


या समाजाच्या मतांवर भाजपचा डोळा


भाजपकडून आगामी निवडणुकीत काही समाजांची मते आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने भाजपने काही समाजांकडे लक्ष पुरवण्यास सुरुवात केली आहे. 


सुतार, होडी बनविणारे, लोहार, घिसाडी, टोपली, चटई, झाडू बनविणारे, काथ्या विणकर, बाहुल्या व खेळणी बनविणारे पारंपारिक कारागीर, सोनार, कुंभार, चांभार, हातोडा व टूलकिट बनविणारे, कुलूप-किल्ली बनविणारे, मूर्तिकार, पाथरवट, दगडफोडे, गवंडी, न्हावी, फुलांचे हार बनविणारे, धोबी, शिंपी व मासे पकडण्याचे जाळे विणणारे कारागीर या समाजाकडे भाजपने लक्ष पुरवण्यास सुरुवात केली आहे.