Navi Mumbai: नवी मुंबईतील वाशी रेल्वेस्थानशेजारी असलेल्या दोन एकर जागेवर भव्य महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार आहे.  यासाठी सिडको व्यवस्थापन १२१ कोटी रुपये खर्च करून ही अलिशान इमारत बांधणार आहे. यासाठीची निविदा सिडकोने प्रसिद्ध केली आहे.


महाराष्ट्र भवनसाठी दहा वर्षांपासून पाठपुरावा


वाशी येथे सर्वच राज्यांचे भवन उभारले गेले असून फक्त महाराष्ट्र भवनाची इमारत नव्हती. यासाठी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी महाराष्ट्र भवन उभारणीसाठी गेल्या दहा वर्षापासून शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला होता. याला अखेर यश आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र भवनाची इमारत उभारण्याचे आदेश सिडकोला दिले होते. 


महाराष्ट्र भवनमध्ये असणार या सोयीसुविधा


महाराष्ट्र भवनाची सुंदर व आलिशान इमारातीसाठी १२१ कोटी रुपये  खर्च येणार आहे. ही इमारत १२ मजल्यांची असून यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, जिजाऊ, डॅा बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आदींचे पुतळे उभारण्यात येणार आहेत. यामध्ये राज्यातून मुंबईत कामासाठी येणाऱ्या लोकांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये शयनगृहाच्या ११ खोल्या तर दुहेरी बेडच्या ७२, तर अतिथीगृह आणि इतर एकूण १६१ खोल्या असणार आहेत. सभागृहामध्ये खोल्यांसह आदी सुविधा यांचा समावेश आहे.