मुंबई : मॉरिशसमधील मोका येथे महाराष्ट्र भवनाच्या विस्तारित वास्तूचा पायाभरणी सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने या प्रकल्पासाठी सुमारे 8 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावेळी सातासमुद्रापार राहूनही मॉरिशसमधील मराठी समाजाने आपली सांस्कृतिक ओळख जपल्याबद्दल रवींद्र चव्हाण यांनी कौतुक व्यक्त केले.

Continues below advertisement

भारत-मॉरिशस संबंधांना नवी दिशा

रवींद्र चव्हाण यांनी दोन दिवसीय मॉरिशस दौऱ्यात अनेक उच्चस्तरीय नेत्यांची भेट घेतली. या भेटींमध्ये भारत-मॉरिशस संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. त्यांनी मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष धरमबीर गोखुल यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत ब्ल्यू इकॉनॉमी, पर्यटन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सायबर सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. 

या दौऱ्यात मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री धनंजय रामफुल, आयटी व इनोव्हेशन मंत्री डॉ. अविनाश रामतोहूल आणि कला-सांस्कृतिक मंत्री महेंद्र गोंदीया यांच्यासोबतही रवींद्र चव्हाणांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत तंत्रज्ञान, शिक्षण, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि AI क्षेत्रातील सहकार्य यावर सकारात्मक चर्चा झाली.

Continues below advertisement

मराठी अस्मितेचं जागतिक केंद्र

मोका येथे उभारल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भवनाच्या विस्तारित वास्तूमुळे मॉरिशसमधील मराठी समाजाला एक मजबूत सांस्कृतिक व्यासपीठ मिळणार आहे. या दौऱ्याचा विशेष ठळक भाग म्हणजे मोका येथे “महाराष्ट्र भवन” विस्तारित वास्तूचा शिलान्यास सोहळा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 8 कोटी रुपयांच्या निधीतून उभारल्या जाणाऱ्या या वास्तूमुळे जागतिक स्तरावर मराठी अस्मिता अधिक बळकट होणार आहे. 

या वास्तूतील सभागृहाला “स्वातंत्र्यवीर सावरकर” यांचे नाव देण्यास स्थानिक समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम, “महा गणेशोत्सव 2025” निमित्त अनुदान वितरण आणि भारताचे मॉरिशसमधील उच्चायुक्त अनुराग श्रीवास्तव यांच्यासमवेत ‘बिहार फेस्टिव्हल’ला दिलेली भेट या माध्यमातून सातासमुद्रापार भारतीय संस्कृतीचा जागर अधिक बळकट झाला. या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्र-मॉरिशस स्नेहबंधाचा नवा अध्याय लिहिला जात असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.

मराठी संस्थांना मदत

मॉरिशसमधील खासदार अर्विन बाबाजी, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे मुख्य धर्मगुरु गुरुजी संताराम राजू,  मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्ष बलराज नारू, मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्टचे अध्यक्ष धनीराव भिवाजी, मॉरिशसमधील मराठी स्पिकिंग युनियनचे अध्यक्ष भालचंद्र गोविंद अशा अनेक उचचपदस्थ मराठी मंडळींशी दौऱ्याच्या निमित्ताने विविध विषयांवर रवींद्र चव्हाण यांनी चर्चा केली. 

मेलरोझ श्री गजानन सरस्वती मंदिर, माँट रोचेस मराठी मित्र मंडळी, विठोबा रखुमाई मराठा मंदिर, डागोटियर मराठी शिव मंदिर, लेसपेरान्स मराठी गणोबा मंदिर, प्रोव्हिडेन्स मराठी मित्र मंडळ आणि पाल्मा मराठी सभा या संस्थांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने रवींद्र चव्हाण यांनी अनुदानाचे धनादेश सुपूर्द केले.

या सर्व घडामोडींमुळे भारत आणि मॉरिशस यांच्यातील सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध अधिक दृढ होत असल्याचे स्पष्ट झाले असून, सातासमुद्रापार मराठी अस्मितेचा जागर अधिक बळकट होत असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.