औरंगाबाद: मराठा मोर्चाच्या बंददरम्यान काल औरंगाबादमध्ये झालेल्या तोडफोडप्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांना ताब्यात घेतलं आहे.


औरंगाबादेत बंददरम्यान शेवटच्या टप्प्यात वाळूज एमआयडीसीत हिंसक वळण लागलं. या हिंसेत वाळूज एमआयडीसीतील 60 कंपन्यांचं मोठं नुकसान झालंय, तर आणखी छोट्या 10 ते 12 कंपन्यांचंही नुकसान झाल्याची माहिती औरंगाबादमधील उद्योजक संघटनेने दिली.

आंदोलकांनी कंपन्यांमध्ये घुसून मोडतोडही केली. वोक्हार्ड कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलकांनी मोठा गोंधळ घातला. मायलॉन, स्टरलाईट या कंपन्यांवरही दगडफेक केली.

आंदोलकांनी बंद कंपनीच्या गेटवर चढून आत प्रवेश केला. काही कंपनींच्या बंद गेटची चावी सिक्युरिटीकडून काढून घेतली. गेट उघडून कंपनीत प्रवेश केला आणि थेट तोडफोड केल्याचं, कंपनीच्या मालकांनी सांगितलं. संबंधित बातमी - वाळूज एमआयडीसीतील सुमारे 60 कंपन्यांची तोडफोड

दरम्यान कालच्या आंदोलनाचा जवळपास 40 कंपन्यांना मोठा फटका बसला असून कोट्यवधींचं नुकसान झाल्याचं म्हटलं जातं. गोंधळानंतर वाळुज औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी काल संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्योजकांनी आम्ही आमचे उद्योग बंद करायचे का असा सवाल विचारला आहे. आंदोलनाच्या निषेधार्थ औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्या आज बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबत उद्योजकांनी सकाळी 11 वाजता बैठक आयोजित केली आहे.

पुण्यातही गुन्हे नोंद

मराठा मोर्चाकडून आयोजित महाराष्ट्र बंदला काल पुण्यात हिंसक वळण लागलं. आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्या एकूण 185 जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय.. सर्वांवर बंडगार्डन कोथरूड येथे गुन्हा नोंदवण्यात येतोय.

मराठा समाजाच्या आंदोलकांनी काल दुपारी 2च्या सुमारास पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली. माध्यमांच्या प्रतिनिधींनाही वार्तांकन करण्यापासून रोखलं. याप्रकरणी 5 महिलांसह 73 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

तर तिकडे चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेकही केली. या दगडफेकीत काही पोलिसही जखमी झालेत. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि अश्रूधुराचा वापर करावा लागला. याप्रकरणी 83 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर डेक्कनमध्ये रस्तारोको करणाऱ्या 21 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.





संबंधित बातम्या 

मराठा आंदोलन : वाळूज एमआयडीसीतील सुमारे 60 कंपन्यांची तोडफोड  

पुण्यातील तोडफोडप्रकरणी 185 जण ताब्यात  

मराठा आंदोलनामुळे 25 दिवसात एसटीचं 50 कोटींचं नुकसान  

शिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं!  

मराठा मोर्चांविरोधात याचिका, आंदोलकांवर दंडात्मक कारवाईची मागणी