मुंबई : लखीमपुर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.  येत्या 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचं आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आले आहे. यादिवशी अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक सेवा सोडून इतर सर्व दिवसभर बंद राहिल, मंत्री जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर याबाबत माहिती दिली. आज राज्य  मंत्रिमंडळाच्या बैठकीत लखीमपूर घटनेतील हिंसाचाराबद्दल  शोक व्यक्त करण्यात आला शेतक-यांवर झालेल्या अमानुष हिंसाचार प्रकरणी सर्व मंत्र्यांनी दोन मिनीटे उभं राहून मृतांना श्रद्धांजली वाहिली.


काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशिवाय आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनाही लखीमपूरला भेट देण्याची परवानगी दिली.  पंजाब आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्रीही राहुल यांच्यासोबत जात आहेत. काँग्रेसचे तीन्ही नेते लखीमपूर खेरीच्या पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे. 






 


लखीमपूरची घटना जालियनवाला बागेसारखी : शरद पवार


लखीमपूरमधील शेतकरी हल्ल्याच्या घटनेची तुलना शरद पवारांनी जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली आहे. आज लखीमपूर हिंसाचारप्रकरणी भूमिका स्पष्ट करण्यासाठी शरद पवारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकार दोन्हींवर निशाणा साधला. उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांप्रती झालेला हिंसाचार ही केंद्रा आणि उत्तर प्रदेशातील राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. तसेच सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाच्या देखरेखीखाली ही चौकशी करावी, अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे.


लखीमपुरात काय झालं होतं?
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते. पण त्याआधीच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.