मुंबईत एसी लोकलच्या फेऱ्या रद्द
मुंबईत नव्यानेच सुरु झालेल्या एसी लोकलच्या फेऱ्याही आज रद्द करण्यात आल्या. चर्चगेट ते विरार या मार्गावर एसी लोकल चालवल्या जातात. त्या आज ‘महाराष्ट्र बंद’मुळे रद्द करण्यात आल्या.
संबंधित बातमी : ‘महाराष्ट्र बंद’ मागे, प्रकाश आंबेडकरांची घोषणा
परीक्षांवर परिणाम
महाराष्ट्र बंदमुळे ज्या विद्यार्थ्यांना आज मुंबई विद्यापीठाची परीक्षा देता आली नाही, त्यांची परीक्षा नंतर होणार आहे. सकाळच्या सत्रातील परीक्षा व्यवस्थित पार पडली. तर दुसरीकडे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यभरात सुरु असलेली शासकीय कॉम्प्युटर टायपिंग परीक्षा (जीसीसी-टीबीसी) रद्द करण्यात आली असून, आजची परीक्षा रविवारी 7 जानेवारीला होणार आहे.
कडेकोट बंदोबस्त
‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. औरंगाबादमध्ये 3000 हजार पोलिस रस्त्यावर होते, तर राज्य राखीव दलाच्या चार तुकड्या तैनात होत्या.
तोडफोड करणाऱ्यांविरोधात मुंबई पोलीस गुन्हे दाखल करणार
ज्या लोकांनी आज मुंबई आणि परिसरात तोडफोड केली, अशा लोकांची ओळख पटवून दंगल आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानाचा गुन्हा मुंबई पोलीस दाखल करणार आहेत. तसेच रेल्वे पोलीस सुद्धा असाच गुन्हा दाखल करणार आहेत.
दिवसभरातील LIVE UPDATE :
5.00 PM : कांजुरमार्ग येथे दोन वेळा रेल रोको केल्यानंतर आंदोलकांना पांगवण्यात पोलिसांना यश, आता मध्य रेल्वे हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात, पश्चिम आणि हार्बर रेल्वे देखील हळूहळू पूर्वपदावर, सध्या रेल्वे वाहतूक कुठेही बंद नाही
4.12 PM : #महाराष्ट्रबंद चा पुकार केलेला, तो मागे घेतोय : प्रकाश आंबेडकर
3.36 PM : महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात, मुंबईतील तणाव निवळला, काहींनी सोशल मीडियातून चुकीची माहिती पसरवली, मात्र दोषींना कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल : दीपक केसरकर
3.29 PM : मुंबई विमानतळाबाहेर वाहनं उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा, रिक्षा-टॅक्सी नसल्यामुळे एअरपोर्टवरच थांबण्याचा अनेकांचा निर्णय
2.58 PM : मुंबई : तब्बल तीन तासांनंतर मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग स्टेशनवरची वाहतूक सुरु, दोन्ही दिशेच्या एक एक ट्रेन रवाना
2.13 PM : महाराष्ट्र बंदमुळे ज्या विद्यार्थ्यांना आज मुंबई विद्यापीठाची परीक्षा देता आली नाही, त्यांची परीक्षा नंतर होणार, सकाळच्या सत्रातील परीक्षा व्यवस्थित पार पडली
2.05 PM : मुंबई : संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन मागे घेऊ, रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांची घोषणा
1.10 PM : मुंबई : घाटकोपर मेट्रो स्थानकात ट्रॅकवर उतरुन मेट्रो अडवली
1.03 PM : पश्चिम रेल्वेही विस्कळीत; दादर, एल्फिस्टन, गोरेगाव, मालाड स्टेशनवर आंदोलन सुरु
1.00 PM : मध्य रेल्वे पूर्णत: ठप्प, सर्व ठिकाणी आंदोलन सुरु, डोंबिवली, ठाणे, कांजूर मार्ग, घाटकोपर, विक्रोळी, कुर्ला, दादर स्टेशन बंद
12.46 PM : मुंबईत घाटकोपरमध्ये आक्रमक आंदोलकांकडून जाळपोळ, टायर जाळले
12.40 PM : दादर स्टेशनवर आंदोलक आक्रमक, मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर उतरुन रेलरेको, वाहतुकीवर परिणाम
12.30 PM : नवी मुंबई : सायन-पनवेल हायवेवर कळंबोली इथे रास्ता रोको, दोन्ही मार्गावर वाहतूक खोळंबली
12.25 PM : ठाणे स्टेशनजवळ ट्रॅकवर उतरुन आंदोलकांनी गाड्या अडवल्या, मात्र पोलिसांनी आंदोलकांना बाहेर काढलं
12.02 PM : आंदोलकांचा रास्तारोको, वरळी नाक्यावरची वाहतूक पुन्हा एकदा बंद
12.00 PM : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर वाहतूक रोखली, दोन्ही दिशांना वाहनांच्या मोठ्या रांगा
11.49 AM : मुंबई : मध्य रेल्वेही विस्कळीत, घाटकोपर रेल्वे स्टेशनवर आंदोलक ट्रॅकवर, दोन्ही बाजूची वाहतूक बंद
11.44 AM : हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत, गोवंडी आणि जुईनगर इथे रेलरोको
11.37 AM : घाटकोपर ते एअरपोर्ट रोड स्टेशनदरम्यान मुंबई मेट्रोच्या वाहतुकीवर परिणाम, 15 मिनिटांत वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता, एअरपोर्ट रोड ते वर्सोवा स्टेशनची वाहतूक सुरळीत
11.29 AM : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आजच्या परीक्षा रद्द नाही, विद्यार्थ्यांना एक तास उशिरा येण्याची मुभा
11.27 AM : रत्नागिरी : आंदोलकांनी मुंबई-गोवा महामार्ग आणि चिपळूण-कराड मार्ग रोखला, बहादूर शेख नाक्यावर कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर
11.23 AM : मुंबई : आंदोलक रस्त्यावर, बोरीवलीजवळ वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर कोंडी
11.19 AM : मुंबईतील घाटकोपरच्या रमाबाईनगर इथे आंदोलक रस्त्यावर, इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर जॅम
11.11 AM : मुंबई : एसी लोकलच्या आजच्या फेऱ्या रद्द
11.09 AM : मुंबई : विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनजवळ रेलरोको, उल्हासनगरच्या दिशेने जाणारी लोकल काही मिनिटं अडवली
11.02 AM : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यभरात सुरु असलेली शासकीय कॉम्प्युटर टायपिंग परीक्षा (जीसीसी-टीबीसी) रद्द, आजची परीक्षा रविवारी 7 जानेवारीला होणार
11.00 AM : हिंसाचार कोणी घडवला, हे मुख्यमंत्र्यांना माहित आहे : प्रकाश आंबेडकर
11.00 AM : याकूब मेमनवर जे गुन्हे दाखल केले होते, तेच गुन्हे भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेवर दाखल करा. न्यायाधीश हा दलित नसावा : प्रकाश आंबेडकर
10.53 AM : नागपुरात शताब्दी चौक आणि जयताळा परिसरात रस्त्यावर टायर जाळून रास्तारोको करण्याचा प्रयत्न, पोलिस घटनास्थळी दाखल
10.50 AM : पुण्यातील औंध भागात जमावाकडून रास्ता रोको
10. 45 AM : मुंबईत वरळी नाक्यावर आंदोलकांचा रास्तारोको, जोरदार घोषणाबाजी, वाहतूक खोळंबली
10.42 AM : नालासोपारा स्टेशनवर ट्रॅकवर उतरुन आंदोलन, वाहतूक विस्कळीत; रेल्वे प्रशासनाकडून आंदोलकांना हटवून रेल्वे सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न
10.15 AM : राज्यातील परिस्थितीवर गृहमंत्रालयाकडून लोकसभेत निवेदन होण्याची शक्यता, हंसराज अहिर निवेदन देण्याची शक्यता, राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्र्यांची काल फोनवरुन बातचित
10.10 AM : बेळगावहून महाराष्ट्रातील शहरांमध्ये जाणाऱ्या बसेस थांबवण्यात आल्या
10.05 AM : दादरमध्ये वाहतूक सुरळीत, पण नेहमीपेक्षा गर्दी कमी
10.02 AM : बुलडाणा एसटी बसेस बंद, बस स्थानकावर पोलिस बंदोबस्त
9.56 AM : गजबजलेल्या स्वारगेट स्थानकात शुकशुकाट, एसटी बसेस न आल्यामुळे पुणे-सातारा, पुणे-बारामती एसटी वाहतूक बंद, इतर मार्गांवर एसटी सुरु, मात्र प्रवासी तुरळक
9.46 AM : सोलापूर शहरात अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात, मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली, शहरात जमावबंदीचे आदेश लागू
9.41 AM : अकोल्यातील सर्व शाळा, महाविद्यालयं पूर्णपणे बंद, बस बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल
9.40 AM : विरार आणि गोरेगाव स्टेशनवरच्या ट्रॅकवरुन आंदोलकांना हटवून रेल्वे वाहतूक सुरु, मात्र वाहतूक उशिराने : पश्चिम रेल्वे
9.36 AM : सांगली डेपोमधून एसटी बस सोडणं बंद, स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी
9.34 AM : औरंगाबादमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त, 3000 हजार पोलिस रस्त्यावर, राज्य राखीव दलाच्या चार तुकड्या तैनात
9.30 AM : पुणे शहरात शांतता, दुकानं, मॉल बंद, बहुतांश शाळांना सुट्टी, रस्त्यावर वाहतूकही कमी
9.29 AM :मुंबईतील गोरेगाव स्थानकावर अडवलेल्या गाड्या रवाना, वाहतूक सुरळीत
9.26 AM : पंढरपूरमध्ये एसटी सेवा बंद
9.21 AM : घाटकोपरमध्ये परिस्थिती सर्वसामान्य, ठाण्याहून मुंबईकडे आणि मुंबईहून ठाणे-मुलुंडकडे जाणारी वाहतूक सुरळीत
9.20 AM : पुणे-बारामती आणि पुणे-सातारा बस सेवा स्थगित : ANI
9.18 AM : मुंबईतील सेंट झेव्हियर्स कॉलेजची अकरावीची कला, विज्ञान शाखेची आजची परीक्षा रद्द, आजच्या पेपरची पुढील तारीख लवकरच जाहीर करणार
9.12 AM : वाशिममध्ये सुरक्षेच्या कारणामुळे शाळा, बाजारपेठ, एसी बस सेवा बंद
9.08 AM : मुलुंड चेक नाका परिसरात टीएमटी, खाजगी बसच्या टायरची हवा काढली, बस रस्त्यातच उभी असल्याने वाहतूक कोंडी
9.07 AM : आज शासकीय सुट्टी नाही, मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती
9.00 AM : विरार स्टेशनवर दहा मिनिटांसाठी अडवलेली ट्रेन रवाना, आंदोलकांना हटवलं, पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत
8.55 AM : अफवांवर विश्वास ठेवू नका आणि पसरवूही नका, तुमचं दैनंदिन कामकाज सुरु ठेवा. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस सज्ज : मुंबई पोलिस
8.55 AM : ठाण्यात रिक्षा सेवा काही प्रमाणात सुरु
8.51 AM : बीड शहरातील बहुतेक शाळांना सुट्टी
8.49 AM : विरार इथे आंदोलकांनी रेल्वे अडवली
8.44 AM : कोल्हापुरात सकाळी सात वाजल्यापासून बंदी आदेश
8.44 AM : अहमदनगरला जिल्ह्यातील अकरा एसटी आगाराची वाहतूक बंद, श्रीरामपूर, जामखेड, पाथर्डी, तारकपूर, श्रीगोंदासह सर्व आगारातील एसटी वाहतूक ठप्प
8.43 AM : रत्नागिरी : सर्वच बाजारपेठा उघडल्या, नागरिकांचे दैनंदिन व्यवहारही सुरळीत
8.42 AM : आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांनी ठाणे रेल्वे ट्रॅकवरील आंदोलकांना हटवलं, सध्या वाहतूक सुरळीत, मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती : ANI
8.41 AM : नवी मुंबई : सीएसटी-पनवेल हार्बर रेल्वे लाईन सुरु, ठाणे-वाशी ट्रान्सहार्बर सुरळीत
8.36 AM : ठाण्यात आंदोलकांनी हायवेवर बस थांबवली
8.33 AM : विरारमध्ये रिक्षा, शाळा बंद, नालासोपारा आणि वसईमध्ये बंदला समिश्र प्रतिसाद
8.30 AM : मुंबईत बेस्ट बसेस सुरळीत सुरु, अत्यावश्यक सोयीसुविधांवर परिणाम नाही, दक्षिण मुंबईत कडेकोट बंदोबस्त, टॅक्सीसेवा सुरळीत
8.29 AM : पालघरमध्ये कडकडीत बंद
8.28 AM :अमरावतीमध्ये सुरक्षेच्या कारणामुळे काही शाळांना सुट्टी
8.28 AM : रायगड जिल्ह्यातील खोपोली, माणगाव , कर्जत, पेण, उरण इथे बंद
8.27 AM : नागपूर : दुकानं उघडण्यास सुरुवात, भाजीवालेही रस्त्यावर दुकान मांडत आहेत
8.26 AM : नागपूर : काही प्रमाणात स्कूल बस सुरु, बंदचा कळमना भाजी मार्केटवर परिणाम, बाजारात भाज्यांचे दर १५ ते २० टक्क्यांपर्यंत पडले
8.25 AM : ठाणे : आंदोलकांनी टीएमटी बस, शिक्षा अडवल्या, आंदोलकांची तीन हात नाक्याकडे कूच, वाहतुकीवर परिणाम
8.20 AM : नाशिक : महाराष्ट्र बंदमुळे सटाणा बस डेपोने सर्व बस बंद ठेवल्या
8.19AM : ठाण्यातील शाळा सुरु
8.19AM : औरंगाबादमध्ये इंटरनेट सेवा आणि एसटी महामंडळाची बस वाहतूकही बंद
8.17AM : ठाण्यात जमावबंदीचे आदेश
8.00 AM : महाराष्ट्र बंदमध्ये कल्याणमधील रिक्षाचालक-मालक संघटना सहभागी होणार आहेत. ठाणे रिक्षा-टॅक्सी चालक मालक संघटनाही सर्व रिक्षा-टॅक्सी बंद ठेवणार आहेत. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमधील रिक्षासेवा बंद राहणार आहेत.
8.00 AM : ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील संघटनांच्या सुमारे सव्वा लाख रिक्षा आणि 10 हजार टॅक्सी रस्त्यावर धावणार नाहीत. लाल बावटा रिक्षा संघटनाही बंद मध्ये सहभागी होणार आहेत.
भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या घटनेनंतर आज (बुधवार, 3 जानेवारी) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन बंदची घोषणा केली. हा बंद शांततेत करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
"महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. लोकांनी शांततेत बंद पाळावा, कोणावरही जबरदस्ती करु नये. आम्ही कोणालाही आव्हान देत नाही आहोत, त्यामुळे प्रतिआव्हान म्हणून आम्ही शहर उघडतो, असं करु नये. हा बंद शांततेत पार पडावा, अशी आमची इतर संघटनांना विनंती आहे." असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
दोषींना तात्काळ अटक करावी अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे, हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि स्थानिक नेते घुगे यांच्यावर चिथावणी केल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.
रिक्षा-टॅक्सी सेवा बंद
महाराष्ट्र बंदमध्ये कल्याणमधील रिक्षाचालक-मालक संघटना सहभागी होणार आहेत. ठाणे रिक्षा-टॅक्सी चालक मालक संघटनाही सर्व रिक्षा-टॅक्सी बंद ठेवणार आहेत. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमधील रिक्षासेवा बंद राहणार आहेत.
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील संघटनांच्या सुमारे सव्वा लाख रिक्षा आणि 10 हजार टॅक्सी रस्त्यावर धावणार नाहीत. लाल बावटा रिक्षा संघटनाही बंद मध्ये सहभागी होणार आहेत.
मुंबईत पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सुरळीत आहे, मात्र मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 च्या ट्रॅकवर उतरुन आंदोलकांनी घोषणाबाजी केली.
एसटी वाहतूक कडेकोट बंदोबस्तात
एसटी महामंडळाने खबरदारीचा उपाय म्हणून कडेकोट बंदोबस्तात एसटी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व विभाग नियंत्रकांनी बसस्थानक, आगार इमारत, नियंत्रण कक्ष, विभागीय कार्यालये, विभागीय कार्यशाळा या सर्व ठिकाणी आवश्यक पोलिस बंदोबस्त मागवून घ्यावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने बस वाहतूक सुरु ठेवावी, असंही म्हटलं आहे. आंदोलनामुळे बदल होणारी माहिती वेळोवेळी बसस्थानकांवरील फलकांवर प्रदर्शित करावी, असा आदेशही देण्यात आला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा उपाय योजण्यात आला आहे.
एसटी तुमचीच, कृपया मोडतोड करु नका, परिवहनमंत्र्यांचं आवाहन
मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी अकोला जिल्ह्यात एसटी सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश दिले आहेत. 2 जानेवारीच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून 3 जानेवारीच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत अकोला जिल्ह्यातील बससेवा बंद राहील. गैरसोय टाळण्यासाठी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
शाळा सुरु, स्कूल बस बंद
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज स्कूल बस न चालवण्याचा निर्णय स्कूल बस असोसिएशन घेतला आहे. बंदच्या काळात एखादी अनुचित घटना घडू शकते, त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कूल बस न चालवण्याचा निर्णय स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी घेतला आहे.
शाळांना सुट्टी देण्यास मात्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नकार दिला आहे. त्यामुळे नियमित वेळेनुसार मुंबईतील शाळा सुरुच राहतील.
अकोला जिल्ह्यातील माध्यमिक आणि जिल्हा परिषदेच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या परीक्षा पुढे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. एमए, एमबीएचे अभ्यासक्रमाचे आज पेपर होणार होते. त्याचप्रमाणे प्रात्यक्षिक परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे सावित्रीबाई फुले विद्यापीठाने आजचा एमफार्मचा एक पेपर पुढे ढकलला आहे.
ही परीक्षा पुणे, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात होणार होती. राज्याच्या काही भागातील संवेदनशील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईतील डबेसेवाही बंद
मुंबईतही बंदची हाक दिली गेल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. वाहतुकीच्या खोळंब्यामुळे डबेवाल्यांच्या सेवेवर परिणाम होतो. जेवणाचे डबे वेळेवर कार्यालयात पोहचले नाहीत, तर त्याचा उपयोग होत नाही. म्हणून मुंबईत जेवणाचे डबे पोहचवण्याची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रात सामाजिक सलोखा कायम राखावा, असं आवाहन मुंबईचे डबेवाले करत आहेत.
लासलगावमध्ये बंदला पाठिंबा म्हणून बाजार समितीत कांद्याचे लिलाव दुपारी बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
संबंधित बातम्या :
अकोल्यात एसटी बंद, तर इतर ठिकाणी कडेकोट बंदोबस्तात वाहतूक
राज्यातील शाळा सुरु राहणार, मात्र स्कूल बस बंद
सणसवाडी दगडफेकीची न्यायालयीन चौकशी होणार : मुख्यमंत्री
पुण्यातील सणसवाडीत दोन गटात वाद, परिस्थिती नियंत्रणात
सणसवाडी दगडफेकीच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंद
दगडफेकीप्रकरणी भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटेंवर गुन्हा