लातूर/मुंबई: जम्मू-काश्मीरच्या सीमेवर घुसखोरी सुरु असताना, आता दहशतवाद आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याचं चित्र आहे. कारण लातूरसारख्या छोट्याशा जिल्ह्यातील एका गावातून, एका अवैध STD सेंटरचं जाळं उद्ध्वस्त करुन, दोघांना अटक करण्यात आली आहे.
या कॉलसेंटरवरुन सीमेपल्याड शत्रू राष्ट्रात माहितीची देवाण-घेवाण होत असल्याच्या संशयावरुन ही छापेमारी करुन, दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. जम्मू काश्मीरमधून लष्करी गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनंतर एटीएसने काल लातूर पोलिसांच्या मदतीने ही छापेमारी केली.
आंतरराष्ट्रीय कॉल अवैध गेटवेच्या माध्यमातून, लोकल लाईनवर वळवून, माहितीची देवाण-घेवाण लातूरमधून चालत होती. अशापद्धतीचं तंत्र गुप्तचर यंत्रणेकडून शेजारी देशांशी संपर्क, माहिती काढण्यासाठी केला जातो. मात्र हे लातूरमध्ये सुरु असल्याने लष्करही अवाक् झालं होतं. त्यावरुन ही छापेमारी करुन, दोघांना अटक कऱण्यात आलं आहे.
96 सिम कार्ड्स, 1 कॉम्प्युटर जप्त
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या प्रकाशनगरमधून इंटरनेट कॉल करुन पाकिस्तानात संपर्क साधला जात असल्याची माहिती, भारतीय लष्कराला मिळाली होती.
धक्कादायक म्हणजे लातूरमधील एका छोट्याशा गावातून तांत्रिक तडजोडी करुन हे कॉल केले जात होते.
लष्कराने दिलेल्या माहितीवरुन एटीएसने लातूरमधील प्रकाशनगरातील एका 33 वर्षीय व्यक्तीच्या घरात छापेमारी केली. त्यावेळी त्यांना 96 सिमकार्ड्स, 1 कॉम्प्युटर, 3 अवैध कॉल ट्रान्सफर मशिन्स सापडले.
एटीएसने केलेल्या या छापेमारीत सुमारे 1 कोटी 90 लाखांची साहित्य जप्त केलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे हा व्यक्ती जे काही कॉलसेंटर सदृश्य सेंटर चालवत होता, ते सर्व बोगस आणि अवैध होतं. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता.
प्राथमिकदृष्ट्या एटीएसने या कॉलसेंटरमुळे सुमारे 15 कोटीचा महसूल बुडाल्याचा ठपका ठेवला आहे.
लातूरपासून 70 किमीवर दुसरी छापेमारी
पहिल्या आरोपीकडून मिळालेल्या माहितीनंतर, एटीएसने लातूरपासून 70 किमी अंतरावरील देवणी तालुक्यातील वलांडी गावात छापेमारी केली.
या छाप्यात एटीएसने 2 आंतरराष्ट्रीय गेटवे, 14 सिमकार्ड्स आणि अन्य संशयास्पद साहित्य,असं 1 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
चाकूरमध्ये छापेमारी
यानंतर मग चाकूर तालुक्यातील जानवळमध्ये 27 वर्षीय व्यक्तीच्या घरावर छापेमारी करण्यात आली. ही व्यक्ती भाड्याच्या घरात अवैध कॉलसेंटर चालवत असल्याचं उघड झालं.
या आरोपीकडून 64 सिमकार्ड, 1 लॅपटॉप आणि 2 आंतरराष्ट्रीय गेटवे मशिन्स असा ऐवज जप्त करण्यात आला.
या छापेमारीमुळे लातूर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लातूरसारख्या जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात अशापद्धतीचे नेटवर्क खरंच उभं राहिलं असेल, तर ही गंभीर बाब आहे. त्यातच पाकिस्तानला जर लष्कराची काही माहिती पुरवली गेली असेल, तर त्याचा तातडीने शोध लावणं आवश्यक आहेच, पण असे 'स्लिपर सेल' कार्यरत आहेत का, याचा आधी तपास घेणं गरजेचं आहे.