मुंबई : राज्याचे हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजत असून चौथ्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारचे चांगलेच वाभाडे काढले. राज्यातील पोलीस दलात सुरु असलेल्या बदल्यांच्या घोटाळ्याची माहिती राज्याच्या गृह सचिवांना दिली होती. पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही असा आरोप विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीसांनी केला. पोलीस जर चार कोटी देऊन पोस्टवर येत असतील तर ते वसुलीच करणार असा आरोपही त्यांनी केला.


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मागील दोन वर्षात अनेक खंडणी प्रकरणे समोर अली आहेत. पोलीस दलाची अवस्था सुधारली गेली नाही तर हे पोलीस दल सर्वोत्तम दल म्ह्णून ओळखलं जाणार नाही. बदल्यांच्या घोटाळ्याची माहिती मी होम सेक्रेटरीला दिली होती. परंतु सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी तो अहवाल फोडला आणि माध्यमाना दिला. जर पोलीस चार कोटी देऊन पोस्टवर येत असतील तर आपोआप ते वसुलीच करणारच."


देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "23 जानेवारीला भूमी अभिलेखची परीक्षा जीए सॉफ्टवेअर घेणार आहे आणि याला सरकारने परवानगी दिली आहे. प्रितेश देशमुख यांची नुकतीच फेसबुक टाईमलाईन डिलीट मारण्यात अली आहे हे असं का घडलं. त्यांचा एका राष्ट्रवादीच्या नगरसेवकासोबत फोटो आहे. आणि फोटो पाहिलं तर लक्षात येईल की यामागे कोण आहे ते. मुळात आशा लोकांना ब्लॅक लिस्ट मधून का काढलं याची माहिती घ्यायला हवी."


जयंत पाटलांच्या संस्थेत घोटाळा
कासेगाव एज्युकेशन ट्रस्टने पनवेल जवळ जमीन घेतली होती. ज्यावेळी जमीन घेतली त्यावेळी दोन वर्षात जमिनीचा वापर होणं गरजेचं होतं. परंतु ते झालं नाही. त्या ठिकणाहून नॅशनल हायवे गेला आणि त्याचा फायदा अपोआप संबंधित संस्थेला झाला आहे. सवलतीच्या दरात जमीन मिळाली असेल त्यावेळी ज्या दरात जमीन घेतली होती तसाच मोबदला मिळायला हवा. परंतु यांना जादा मोबदला मिळाला आहे. असाच प्रकार या संस्थेने आणखी एका ठिकाणी केला आहे.


'शिवभोजना'च्या नावाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पुनर्वसन
राज्यात सुरु असलेल्या शिवभोजन थाळीच्या नावाखाली शिवसेनेने आपल्या कार्यकर्त्यांचं पुनर्वसन केल्याचा आरोप करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज्यात शिवभोजन थाळी सुरु करत असल्याचा मोठा गाजावाजा केला.आता ती जागा दलालांनी घेतली आहे. या योजनेमध्ये पैसे घेऊन काम देण्यात आले. एकाच व्यक्तीच्या नावावर ही काम देण्यात आली. राज्यात एकूण 1548 केंद्र आहेत. यात अनेक ठिकाणी बोगसगिरी आहे सुरु आहे."


पोषक आहारात मोठा घोटाळा झाला आहे. परिणामी पालघरमध्ये कुपोषित तीन हजार 149 मुलं होती आणि ऑगस्टमध्ये 40 कुपोषित मुलं मिळाली आहेत. त्यातील 24 बालके मृत जन्माला आली अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.


या सरकार मध्ये सगळ्यात फायद्यात अजित पवार आहेत. कारण राष्ट्रवादीच्या सर्व विभागांना सर्वात जास्त निधी मिळाला आहे. राष्ट्रवादीच्या विभागांना 2 लाख 50 हजार 388 कोटी आत्तापर्यंत मिळाले आहेत. त्या खालोखाल काँग्रेसला1 लाख 1 हजार 766 कोटी. ज्यांचे सर्वात जास्त आमदार आहेत त्या शिवसेनेला केवळ 54 हजार 343 कोटी रुपये मिळाल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. 


महत्त्वाच्या बातम्या :