मुंबई : गेल्या वर्षभरापासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यपदाच्या निवडणुकीचा (Vidhansabha Speaker) पेच अद्याप कायम आहे. या निवडणुकीत होणाऱ्या गुप्त मतदान पद्धतीत बदल करून आवाजी पद्धतीने मतदान घेण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला. आघाडी सरकारच्या या निर्णयावर भाजपने सडकून टीका केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल राज्यपालांची भेट घेतली. परंतु, आवाजी मतदानानं निवडणूक घटनाबाह्य असल्याची भूमिका राज्यपालांनी घेतली आहे. असा उल्लेख राज्यपालांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात केला आहे. असे असली तरी राज्यपालांनी मंजुरी दिली नाही तरी निवडणूक घेण्यावर महाविकास आघाडी सरकार ठाम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे पत्रही राज्यपालांना पाठवले आहे.
विधी मंडळाने नियम बदलले ते विधी मंडळाचे अधिकार आहेत. अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात आज सायंकाळपर्यंत राज्यपालांनी मंजुरी द्यावी असा पुनरुच्चार करण्यात आला आहे.
आज उशिरापर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता
दरम्यान, आघाडी सरकार राज्यपालांनी मंजुरी दिली नाही तरी निवडणूक घेण्यावर ठाम असल्याने आज सायंकाळपर्यंत राज्यपालांनी निवडणुकीसाठी परवानगी दिली नाही तरी राज्य सरकार निवडणूक घेणार आहे. त्यामुळे आज उशिरापर्यंत विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ या नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. महाराष्ट्र विधानसभा नियमाच्या कलम 6 नुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपालांची भूमिका निर्णायक असते. राज्यपालांनी तारीख निश्चित केल्याशिवाय अध्यक्षांची निवडणूक घेणे शक्य नसते. त्यामुळे भाजपच्या विरोधामुळेच राज्यपाल अध्यक्षांच्या निवडणूक पद्धतीत करण्यात आलेल्या बदलांबाबत विचारणा करू शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या