नागपूर : नागपुरात (Nagpur) सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session 2023) आज तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खंडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्द्यावरुन अधिवेशाचे दोन दिवस सभागृहांमध्ये गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार हे पाहणं जास्त गरजेचं ठरेल. तसेच आज विधीमंडळावर अनेक मोर्चे देखील धडकणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस हा वादळी ठरण्याची शक्यता आहे. 


अवकाळीच्या मुद्द्यावर चर्चा होणार


नागपुरातसध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन  सुरु आहे. या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी हिवाळी अधिवेशनावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.आज  विधानसभेत अवकाळी पावसावर  चर्चा होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या चर्चेचा निर्णय देणार आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या चर्चेची मागणी केली होती. त्याच प्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या मुद्द्यावर चर्चा करण्याची तयारी दाखवली होती. या चर्चासत्रामध्ये विरोधक अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. 


विधीमंडळावर मोर्चे धडकणार


अनेक मुद्द्यांवर आज नागपुरात मोर्चे जाम असणार आहेत. आजचा सर्वात प्रमुख मोर्चा हा  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा असणार आहे.  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमी वरून निघणारा मोर्चा विधिमंडळापर्यंत जाऊन सभेत रूपांतरित होईल. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय बडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते सहभागी होतील. धनगरांच्या आरक्षणासाठी सकल धनगर समाज समन्वय समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.  


धनगर समाजाला अनुसूचित जमाती मधून आरक्षण देण्यात यावा तसेच धनगर मेंढपाळांच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीसाठी विदर्भवादी आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने  जुनी पेन्शन लागू करावी, शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादू नये या मागणीसाठी मोर्चा काढला जाणार आहे. 


आदिवासींचा मोर्चा जनसेवा गोंडवाना पार्टीच्या वतीने विधीमंडळावर मोर्चा काढला जाणार आहे. दिवासींनी जात प्रमाणपत्र मिळवून नोकऱ्या बळकावल्याच्या मुद्द्यावर हा मोर्चा काढला जाईल. हिंगणघाट तालुक्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावं या मागणीसाठी भारत राष्ट्र समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. 


उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अधिवेशनाला उपस्थित राहणार


हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे हे अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे कोणत्या मुद्द्यावर सरकारला घेरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 


कांदा निर्यातबंदीवर आंदोलन 


केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने शेतकऱ्यामध्ये तीव्र नाराजी आहे. सध्या राज्यभरात शेतकऱ्यांकडून केन्द्र सरकार विरोधात आंदोलने सुरु आहेत. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची भेट घेतली आणि शेतकरयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. परंतु सत्ताधारी पक्षाला या मुद्द्यावरून लक्ष करण्यासाठीं विरोधक जोरदार तयारी करण्याचा अंदाज आहे. त्याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन करण्याची शक्यता आहे. 


हेही वाचा : 


Winter Session 2023 : अधिवेशनाचा तिसरा दिवस ठरणार वादळी? अनेक मोठे मोर्चे विधिमंडळावर धडकणार