Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या विरोधातील ठराव गुरुवारी कर्नाटकच्या विधानसभेत एकमताने मंजूर झाला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारही आक्रमक झाले आहे. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र सरकारही सीमावादावर प्रस्ताव आणणार आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. पुढील आठवड्यात सीमावादवर प्रस्ताव आणला जाणार आहे. हा प्रस्ताव कर्नाटक राज्यापेक्षा दहा पट अधिक प्रभावी असेल, असं देसाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं.
महाराष्ट्राला एक इंचही जागा न देण्याचा ठराव कर्नाटक सरकारने पारित केला होता. तसेच कर्नाटकाकडे कोणीही वक्रदृष्टीने पाहिल्यास कोणत्याही गोष्टीची पर्वा केली जाणार नाही, असा इशारा यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राला दिला. तसेच यावेळी भाषण करताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रावर टीका केली.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय चुकीचा -
शंभूराज देसाई यांनी नागपूर येथे विधानमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ''राज्य सरकार सोमवारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर विस्तृत प्रस्ताव आणणार आहे. हा प्रस्ताव कर्नाटक सरकारपेक्षा दहा पट अधिक प्रभावी असेल." केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यानंतरही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामते हा वाद चर्चेनं सोडवला जाऊ शकतो, असेही देसाई म्हणाले.
आजच आणणार होतो प्रस्ताव -
आमचं सरकार सीमावादावर आजच प्रस्ताव पारित करणार होतं. पण भाजप आमदार मुक्ता टीळक यांच्या निधनामुळे हा प्रस्ताव पटलावर आणला नाही. सोमवारी हा प्रस्ताव पटलावर आणला जाणार आहे. हा प्रस्ताव कर्नाटक सरकारपेक्षाही दहापट अधिक प्रभावी असेल. तसेच हा प्रस्ताव मराठी लोकांच्या हिताचा असणार आहे. प्रस्ताव पारित झाल्यानंतर महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात प्रवेश करु न दिल्यामुळे केंद्राकडे नाराजी व्यक्त करणार आहोत, असे मंत्री देसाई यांनी सांगितलं.
लवकरच बेळगावला जाणार -
तीन डिसेंबर रोजी मराठी भाषिक बांधवांना भेटण्यासाठी आम्ही बेळगावला जाणार होतो. नंतर तेथील काही बांधवांनी आम्हाला सहा डिसेंबरला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिवसाच्या कार्यक्रमात येण्याची विनंती केली.. मात्र, दुर्दैवाने कर्नाटक सरकारने आमच्या दौऱ्याला वेगळे वळण दिले. पोलीस बंदोबस्त वाढवत सीमेवरील चेक पोस्टवर नाकाबंदी केली. मराठी भाषिकांना नोटीसा दिल्या आणि त्यामुळे तणाव वाढला... अशा परिस्थितीत आमच्या जाण्याने बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये म्हणून आम्ही 6 डिसेंबरला तिकडे गेलो नाही... अधिवेशन संपलं की मी आणि चंद्रकांत दादा चर्चा करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना अधिकारीकरित्या कळवून बेळगावला जाणार आहोत, असे शंभूराज देसाई म्हणाले.