मुंबई: राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून, शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान देऊन आज एकनाथ शिंदे सरकारने आपलं बहुमत सिद्ध केलं. अनेक अडचणी समोर असतानाही एकनाथ शिंदेंनी ही किमया करुन दाखवली. शिंदे-फडणवीस सरकारच्या आजच्या बहुमत चाचणीच्या दिवशी चर्चा मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या 72 तासांच्या त्या सरकारची झाल्याचं दिसून आलं. 


अडीच वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यासंबंधी वाटाघाटी सुरू असताना 23 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याची बातमी धडकली. काही काळ हे असं काही घडलं याच्यावर लोकांचा विश्वासही बसेना, झोपेतून उठलेल्या महाराष्ट्राला हा जबर धक्का होता. हे सरकार अडीच दिवस चाललं, बहुमत सिद्ध न करता आल्यामुळे सरकार कोसळलं. ते सरकार पडलं याची सल देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या मनात आजही आहे. शिवसेना, काँग्रेसने ज्या-ज्या वेळी संधी मिळेल त्या-त्या वेळी यावरुन या दोघांना टोमणे मारले आहेत. 


आताही राज्यात नवं सरकार आलं असताना, त्या पहाटेच्या शपथविधीचा, 72 तासांच्या त्या सरकारची आठवण अनेकांनी काढली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपनेते सुधीर मुनगंटीवार आणि स्वत: अजित पवारांनीही त्याचा उल्लेख आज केला. 


देवेंद्र फडणवीस यांच्या मनात सल कायम, आपले सहकारी असा उल्लेख
ते 72 तासांचे सरकार अडीच दिवसात पडलं याची सल देवेंद्र फडणवीसांच्या मनात आजही आहे, त्याची प्रचिती आजही आली. अजित पवारांची विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना ते म्हणाले की, अजित पवार हे माझ्या 72 तासांच्या सरकारमधील सहकारी आणि माझे मित्र आहेत. आज राष्ट्रवादीवाल्यांना वाटत असेल की तेच बरं होतं. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा असताना नाईलाजाने त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं, याबद्दल ते नाराज असल्याचं सांगितलं जातं. फडणवीस शक्यतो 72 तासांच्या त्या सरकारवर बोलत नाहीत, पण त्यांनी आज त्याचा आवर्जून उल्लेख केला. ते जर जमलं असतं तर आज देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असते हे नक्की. 


मुख्यमंत्र्यांच्या अर्धवट वाक्याने सभागृहात हशा
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आज त्या 72 तासांच्या सरकारची आठवण काढली. अजित पवार यांच्या कारकीर्दीचा आढावा घेताना एकनाथ शिंदे यांनी त्या पहाटेच्या शपथविधीचा अर्धवट उल्लेख केला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-राष्ट्रवादीच्या..... असं अर्धवट वाक्य बोलल्यानंतर, त्याचा उल्लेख नको असं शिंदे म्हणाले आणि सभागृहात एकच हशा पिकला.


अजितदादांनी आमच्यासोबत शपथ घेतली आणि आता सल्ले देतात
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी 72 तासांच्या त्या सरकारची आठवण काढून राष्ट्रवादीला चिमटा काढला. ते म्हणाले की, "जसं त्या वेळी राष्ट्रवादीवाले तिकडून इकडे आले होते, त्याच पद्धतीने आज शिवसेनेवाले आले. त्यामुळे इकडे आलेले पराभूत होतील असं म्हणणं चुकीचं आहे. अजितदादांनी आमच्यासोबत शपथ घेतली, आणि चर्चा कशाची होतेय तर ती पहाट होती की सकाळ. आता ते आम्हाला सल्ले देतात.". अजितदादा, तुमच्या मनात काय आहे हे आमच्या कानात सांगा असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं. 


ती पहाट नव्हती, सकाळ होती...अजितदादा वैतागले
अजित पवारांनी या आधीही अनेकदा अक्षरश: वैतागून त्या शपथविधीवर भाष्य केलं आहे. आपण आणि देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली ती शपथ ही पहाटेची नव्हती, सकाळची होती असं अजितदादा म्हणाले आहेत. तरीही ती घटना राज्याच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये 'पहाटेचा शपथविधी' याच नावाने ओळखली जाते. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा तो पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग फसला असला तरी त्यानंतर अजित पवार मात्र भाजपविरोधात जास्त बोलले नाहीत. तसेच या दोन नेत्यांचा एकमेकांविषयी सॉफ्ट कॉर्नर असलेला दिसतोय.


राजकारणात काहीही शक्य असतं, कोणीच कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो याची प्रचिती जनतेला क्षणाक्षणाला येत आहे. काय माहिती, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांचे केलेले कौतुक आणि देवेंद्र फडणवीसांनी आज जाणून-बूजून काढलेली आठवण ही गोष्ट राज्याच्या राजकारणाची नवी नांदी असू शकते.