मुंबई: राज्यातील सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रिक्षा आणि टॅक्सी भाडे वाढवण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी माहिती दिली. त्यामुळे आधीच महागाईचा फटका बसलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागण्याची चिन्हं आहेत.


परिवहन मंत्री अनिल परेब यांच्या हस्ते आज आरटीओ खात्यातील सहा सुविधा फेसलेस करण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी अनिल परब यांनी ही माहिती दिली. रिक्षा आणि टॅक्सी भाड्यामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी सातत्याने संबंधित संघटनांकडून केली जात आहे. पेट्रोल-डिझेल यांच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने ही मागणी करण्यात येत आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत असताना सीएनजीच्या किंमतीतही वाढ होत आहे. त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सींना तोटा सहन करावा लागत असल्याची तक्रार संबंधित संघटनांकडून केली जात आहे. 


राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, "महाराष्ट्रातील अपघात रोखण्यासाठी आरटीओ विभाग काम करत आहे. तालुक्यात अपघात होणारे ब्लॅक स्पॉट किती आहेत, त्यात काय सुधारणा करण्यात आल्या आहेत याचा अहवाल मागविण्यात आला आहे. लो स्पीड इलेक्ट्रिक गाड्या, हाय स्पीडने पाळविल्या जात आहेत. या अशा प्रकारच्या दोन हजार इलेक्ट्रिक गाड्यावर कारवाई करण्यात आली आहे. इलेक्ट्रीक वाहने लो स्पीड बनविण्याचे लायसन्स बनून हाय स्पीड केल्या जात आहेत. लो स्पीडचा फायदा घेत असेल, कोणी कायदा मोडत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. नियमांचे उल्लंघन होत असेल तर कारवाई केली जाईल."


येत्या काळात 2000  इलेक्ट्रिक आणि 1000  CNG गाड्या एसटीच्या ताफ्यात घेणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. 


आरटीओच्या सहा सुविधा फेसलेस
पूर्वी वाहनासंबधीत आणि लायसन्स संबधीत कामे करण्यासाठी आरटीओ कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आरटीओची कामं म्हटलं की कानाला हात लावायचे. मात्र आता आरटीओमधील काही कामे आरटीओत न जाता करता येणार आहेत. परिवहन विभागात वाहनाच्या आणि अनुज्ञप्तीच्या (लायसन्स) प्रत्येकी तीन अशा एकूण सहा सेवा आता फेसलेस होणार आहेत.


आता ही कामे आरटीओमध्ये न जाता होणार ; काय काय फेसलेस होणार ?


1. आरटीओमधील वाहनांच्या या सेवा : वाहन कागदपत्रांवरील पत्ता बदल, डुप्लिकेट आरसी बुक,  स्थानांतर noc


2. लायन्ससच्या या सेवा : पत्ता बदल, रिनीव्हल ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स, डुप्लिकेट लायसन्स


जवळपास 17 ते 18 लाख लोकांच्या वर्षभरातील आरटीओच्या फेऱ्या वाचणार आहेत. पूर्वी या सुविधा ऑनलाइन होत्याच मात्र एकदातरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी त्या व्यक्तीला आरटीओ कार्यालयात जावे लागत असे. मात्र या पुढे या सेवांसाठी आता आरटीओ ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही सर्व ऑनलाइनच होणार.