Crime News : दीड कोटींच्या खंडणीच्या मागणीला वैतागून एका डॉक्टराने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  बनावट रेमडिसीविर इंजेक्शन प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील अर्ज मागे घेण्यासाठी दीड कोटींची खंडणी मागण्यात येत होती. लातूर येथील खेर्डा येथे ही घटना घडली. डॉ. नामदेव गिरी असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. या प्रकरणी मयत डॉक्टरच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन वाढवणा पोलिसांत दोघांविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला. 


कोरोना महासाथीच्या दुसऱ्या लाटेमध्ये उदगीर येथील महेशकुमार जिवणे यांनी त्यांची आई  शांताबाई त्र्यंबकराव जिवणे यांना उदयगिरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान शांताबाई जिवणे यांचा मृत्यू झाला होता. जुलै २०२१ मध्ये महेशकुमार जिवणे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल केली होती.  रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांच्या मातोश्रींना डॉ. नामदेव गिरी व डॉ. माधव चंबुले यांनी संगनमत करुन उपचारासाठी बनावट भेसळयुक्त रेमडीसीवर इंजेक्शन दिले. हे इंजेक्शन खरे असल्याचे भासवून त्यांची 90 हजारांची फसवणूक केल्याची तक्रार केली होती. या प्रकरणात डॉ. माधव चंबुले व डॉ. नामदेव गिरी या दोघांविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि कलम 420, 274, 275, 276, 34  अन्वये गुन्हा दाखल झाला होता. दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यासाठी गुन्ह्यातील तक्रारदार महेशकुमार जिवणे व विकास देशमाने यांनी डॉ. नामदेव गिरी यांच्यांकडे दीड कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. 


आरोपींच्या मानसिक त्रासाला कंटाळून डॉ. नामदेव गिरी यांनी 25 मे 2022 रोजी सायंकाळी खेर्डा येथील त्यांच्या राहत्या घरी शेतातील पिकावर फवारणीचे विषारी औषध प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, मंगळवारी डॉ. गिरी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


खंडणीसाठी मानसिक त्रास 


खंडणीची रक्कम न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना मानसिक त्रास देण्यात आल्याची तक्रार डॉ. गिरी यांच्या पत्नी सुनंदा गिरी यांनी वाढवणा पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून डॉ. नामदेव गिरी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी महेशकुमार जिवणे यास वाढवणा पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. बुधवारी आरोपीस उदगीरच्या न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.