अमरावती :  अमरावतीच्या पी आर पोटे पाटील एज्युकेशन कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास लोखंडी शिळीमध्ये विद्युत प्रवाह येऊन 4 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार कठोरा रोडवरील आमदार प्रवीण पोटे यांच्या पी आर पोटे पाटील एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमधील मुख्य प्रवेशद्वाराच्या रंग रंगोटीचे काम सुरू आहे. मुख्य प्रवेशद्वारासमोरून हाय टेन्शन लाईन गेली आहे. आज महाविद्यालयाचे चार शिपाई अक्षय सावरकर, प्रशांत शेलोरकर , संजय दंडनाईक आणि गोकुळ वाघ हे आज सकाळी मुख्य प्रवेश द्वाराचे रंग रंगोटी करतांना लोखंडी शीळीची हायटेंशन लाइनला स्पर्श झाला आणि चारही कर्मचाऱ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.  विद्युत प्रवाह इतका जास्त होता की लोखंडी शिळीचे पाय जागीच वितळले.


पी आर पोटे पाटील एज्युकेशन कॉलेजवर आरोप


कॉलेजमधील शिपायांनाच कामाला लावलेया दुर्दैवी घटनेत अक्षय सावरकर (वय 26), प्रशांत शेलोरकर (वय 31), संजय दंडनाईक (वय 45) आणि गोकुळ वाघ (वय 29) असे या चारही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ते चौघेही याच कॉलेजमध्ये शिपाई पदावर कार्यरत होते. कॉलेज प्रशसनाने बाहेरुन मजूर न बोलावता थेट कॉलेजमधील कर्मचारी कॉलेजच्या गेटच्या रंगरोटीसाठी लावल्याने याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. रंगरंगोटी करण्यासाठी लोखंडी शिडीवर सर्वजण चढले असता वरून विजेच्या तारा असल्याने या तारेचा धक्का शिडीला लागला. याचवेळी हे चारही जणांना जोरदार शॉक लागला. त्यात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.


गुन्हे दाखल करण्याची मागणी


या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. चारही मृतदेह पोलिसांनी ताब्यात तत्काळ ताब्यात घेतले. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


शॉक लागून मृत्यू झालेल्यांची नावे


अक्षय सावरकर (वय 26)
प्रशांत शेलोरकर (वय 31)
संजय दंडनाईक (वय 45)
गोकुळ वाघ (वय 29)


खासदार नवनीत राणा जिल्हा रुग्णालयात


घटनेची माहिती मिळताच खासदार नवनीत राणा जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. यावेळी त्यांनी मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांशी संवाद साधला. यावेळी तिथं मोठा जमाव झाला होता. 


टाकळी जहागीर येथील दोघांचा मृत्यू


या घटनेत टाकळी जहागीर येथील दोन तरुणांचा मृत्यू झाला. त्यामुळे गावात शोककळा पसरली आहे. गावातील नागरिक यावेळी मात्र, आक्रमक झाले आहे. मृत युवकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि एका व्यक्तीला कॉलेजमध्ये नोकरी देण्याची मागणी करत आहेत. मागणी पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



इतर महत्त्वाच्या बातम्या :


मोठ्या शहरात तिसऱ्या लाटेला सुरुवात, पुढील 6 आठवडे चिंतेचे; टास्क फोर्सचा इशारा