नागपूर : राज्यात जानेवारी ते जून या सहा महिन्यात तब्बल 1 हजार 74 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. रोज सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 50 हजार कोटींचा पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

रोज कोरोनाचं वाढतं संकट, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची वाढती संख्या याचीच चर्चा होत असताना राज्यात गेल्या सहा महिन्यात तब्ब्ल 1 हजार 74 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. 1 जानेवारी ते 30 जून या सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यात एक हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून राज्य सरकार गप्प असल्याचा आरोप ही बावनकुळे यांनी केला.

 50 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा

शेतकऱ्यांच्या अवस्थेकडे गेले सहा महिने राज्य सरकारने प्रचंड दुर्लक्ष केले आहे. त्यातच कोरोनाचा संकट आल्याने सर्वच बाजारपेठा संकटात आल्या. कोरोना संकटाच्या काळात जसं इतर बाजारपेठांवर संकट कोसळलं. तसंच शेतमाल आणि भाजीपाल्याच्या बाजारपेठांवर ही संकट कोसळलंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनांना गेले अनेक महिने कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे नैराश्यात असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे जीवन संपवल्याचे बावनकुळे म्हणाले. राज्य सरकारने त्वरित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 50 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे अशी मागणी ही बावनकुळे यांनी केली आहे.

रोज सरासरी सहा शेतकऱ्यांची आत्महत्या 

गेल्या सहा महिन्यात राज्यात 1 हजार 74 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून सरासरीने रोज सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं यामुळे उघड झालं आहे. मार्च महिन्याच्या अखेरपासून कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्याचा सर्वाधिक फटका राज्यातील शेतमालाच्या बाजारपेठेला परिणामी शेतकऱ्यांना बसला आहे. खासकरून फळे आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. अजून ही फळे आणि भाजीपाला शहरातील बाजारापर्यंत पोहोचू शकत नाही आहे. परिणामी मालाची नासाडी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचे पॅकेज आणावे अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.