Mahaparinirvan Din LIVE : 66 व्या महानिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

Mahaparinirvan Din LIVE : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील दादरमधल्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे.

स्नेहा कदम, एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Dec 2022 11:02 AM
उद्धव ठाकरे यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Mahaparinirvan Din : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यावेळी त्यांच्यासोबत संजय राऊत, अनिल परब, नीलम गोऱ्हे आणि आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. 

बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशाला सर्वोत्तम संविधान प्राप्त : देवेंद्र फडणवीस

Mahaparinirvan Din : बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशाला सर्वोत्तम संविधान प्राप्त झालं. डॉ. आंबेडकर यांचा संदेश देशाच्या हिताचा आहे. बाबासाहेबांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करुया, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

सांगलीच्या कडेगावमधील अभिजीत कदम प्रशाला जुनियर कॉलेजमध्ये वह्या आणि पुस्तकांच्या माध्यमातून महामानवाला अनोख्या पद्धतीने अभिवादन

Sangli Mahaparinirvan Din : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित सांगलीतील कडेगावमधील अभिजीत कदम प्रशाला जुनियर कॉलेजमध्ये अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आलं. 3221 वह्या आणि पुस्तकांच्या माध्यमातून 3500 स्क्वेअर फुटांची महामानव डॉक्टर बाबासाहेबांची कोलाज प्रतिकृती साकारली.



राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

Mahaparinirvan Din LIVE : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन, प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित



 



 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळातच चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करणार

Mahaparinirvan Din : 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी आठ वाजता चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील. 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडून बाबासाहेबांना आदरांजली

66th Mahaparinirvan Din : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईतील दादरमधील चैत्यभूमीवर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहिली.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाशिममध्ये कॅडल मार्चचे आयोजन  

Washim Mahaparinirvan Din : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाशिम इथे कॅन्डल मार्च रॅली आणि अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी हातात प्रज्वलित मेणबत्ती घेऊन डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

पार्श्वभूमी

Mahaparinirvan Din : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये महापरिनिर्वाण झालं आणि संपूर्ण भारतावर दु:खाचा डोंगर कोसळला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक, लेखक, पत्रकार असे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत. इतकंच नव्हे तर त्यांना 'भारतीय राज्यघटनेचे जनक' म्हणूनही ओळखलं जातं. अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे आंबेडकर हे पहिले भारतीय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, स्त्रिया, मजूर यांच्यावरील सामाजिक भेदभावाविरुद्ध आयुष्यभर लढा दिला.


दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील दादरमधल्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे. दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून चैत्यभूमी येथे अनुयायी येतात. त्यानिमित्ताने चैत्यभूमी परिसरात रंगरंगोटी, दिवाबत्ती, पुष्प सजावट आदी कामे केली जातात. तसंच, डॉ. बाबासाहेबांचं निवास असलेलं राजगृह आणि परळ इथल्या बीआयटी चाळ या ठिकाणी देखील अनुयायी भेट देत असल्याने तिथेही व्यवस्था करण्यात येते. 


बेस्टकडून 50 अतिरिक्त बस, 400 जादा दिव्यांची व्यवस्था


बाबासाहेबांचे अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. या अनुयायांसाठी आज विविध प्रकारच्या सेवा देण्यात आहेत. मोठ्या संख्येने समाजातील दुर्बल घटक आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांसाठी बेस्टने स्वस्त आणि चांगली सेवा देण्याचा निर्णय घेतला. तसेच 400 जादा दिव्यांची आणि 50 जादा बसेसची व्यवस्था भाविकांसाठी उपलब्ध केली आहे. स्मारकाला रोषणाई केली असून अखंड वीज पुरवठ्यासाठी जनरेटर्सची देखील व्यवस्था केली आहे. तोट्याची पर्वा न करता आधुनिक व्यवस्थेद्वारे जगातील सर्वात स्वस्त आणि चांगली वाहतूक सेवा बेस्ट कडून सामाजिक बांधिलकी म्हणून देण्यात येते. दैनंदिन बसपासद्वारे भाविक प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन हो हो सेवेद्वारे घेऊ शकतील. त्याचबरोबर बेस्टने प्रथमोपचार व अल्पोपहार देखील पुरवण्याची व्यवस्था केली आहे.


चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त 


महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क येथे मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांसह वाहतूक पोलीस, एसआरपीएफ, बॉम्बशोधक पथक आणि इतर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.


संबंधित बातमी



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.