मुंबई: राज्यात गणेशोत्सवाच्या सोबतच गौरी अर्थात महालक्ष्मीच्या आगमनाचे वेध लागलेले असते. गणपती बाप्पासोबत राज्यभर गौराईचेही घरोघरी आगमन झाले आहे. गौरी म्हणजेच महालक्ष्मीचे आगमन झाल्यानंतर घरोघरी पारंपारिक पद्धतीने पूजा करून नैवेद्य दाखवण्यात आला. यंदा कोरोनामुळं बंधनं आली असली तरी सोशल डिस्टनसिंग व इतर नियमांचे पालन करून घरी गौरी आणल्या आहेत. यात गौरीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देखील दिले आहेत. कुठे गौरी डॉक्टरांच्या रुपात आल्य़ा आहेत तर कुठे पोलिसांच्या रुपात.


 कोरोना योद्ध्यांच्या रुपात गौराई


सातारा पोलीस दलातील शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या महिला पोशि.कोमल पवार यांनी आपल्या घरी पोलीस व डॉक्टर या कोरोना योध्यांच्या रुपात गौराई बसवून सर्वांना मास्क घालण्याचा व शासनाच्या नियमांचे पालन करण्याचा मोलाचा संदेश दिला आहे. त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून केलेली जनजागृती कौतुकास्पद आहे.


डॉक्टरच्या रुपात गौरी साकारल्या, कोरोनापासून काजळी घेण्याचे आवाहन


बारामती येथील कमल अविनाश भापकर यांच्या घरी गौरी गणेशाचे आगमन झाले. त्यांच्या घरचा गणपती सात दिवसाचा असतो. त्यांनी या वर्षी कोरोनामुळे समस्त मानव जातीवर उद्भवलेल्या संकटावर आधारीत गौरीची सजावट केली आहे. विशेष म्हणजे गौरी या डॉक्टरच्या रुपात साकारण्यात आल्या असून कोरोनापासून काजळी घेण्याचे आवाहन त्या करत आहेत असा देखावा केला आहे. प्रत्येकाने आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर ठेवून कोरोनापासून बचाव करावा हा उद्देश हा देखावा साकारण्यामागे असल्याचे भापकर सांगत आहेत.


बीडमध्ये मास्क घालून आल्या गौरी


कोरोनाच्या संकटकाळात यावर्षी इतर सणाप्रमाणे महालक्ष्मी सणवारावरही कोरोनाचे सावट पाहायला मिळतंय. केज शहरातील डॉ.कविता कराड यांनी यावेळी गौरीची सजावट करताना दोन्ही गौरींना मास्क घातला आहे. या सोबतच सामाजिक आंतर, हात वेळोवेळी धुणे, सॅनिटायझर वापरणे, मास्क वापरणे, "स्टे होम स्टे सेफ" असा संदेश देणारा देखावा साकारला आहे. जागतिक महामारी च्या काळातही आपण सर्वजण गौरी गणपतीचा सण साजरा करत आहोत. मात्र या सणावरही कोरोनाचे सावट आहे तरी घाबरून न जाता काळजी घेण्याबाबत सुंदर असा देखावा गौरी पुढे साकारला आहे.


अमरावतीत दागिन्यांची महा'लक्ष्मी'


घरोघरी मोठ्या भक्तिभावाने गौरीचं आगमन झालं. अमरावतीच्या एका सराफा व्यापाऱ्यांच्या घरी सुद्धा गौरीचं आगमन झालं. या सराफा व्यापाऱ्यांच्या घरातील गौरीला दागिन्यांने सजविले असल्याने मखर सुद्धा अतिशय सुंदर आणि मनमोहक सजावट केल्याने इथली महा'लक्ष्मी' जरा हटके आहे. अमरावती शहरातील घोगटे कुटुंबाच्या घरी मागील 25 वर्षापूर्वीपासून महालक्ष्मी बसविल्या जातात. सुरुवातीला साध्या पद्धतीने पण मोठ्या भक्तिमयाने गौरी बसायच्या पण कालांतराने त्यांचे मुलं मोठे झाले आणि आज त्यांचा अमरावती शहरात सराफा व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांच्या घराची गौरी दागिन्याने सजली आहे. मखर सुद्धा अतिशय मनमोहक सजविली गेली आहे.


अकलूजच्या देशमुख कुटुंबाच्या गौराई आल्या डॉक्टरांच्या रूपात


अकलूज येथील देशमुख कुटुंबातील दोन्ही डॉक्टर मुलगा व मुलगी गावाबाहेर ड्युटी करीत असताना कुटुंबाने डॉक्टरांच्या रूपातील गौराई घरी आणून कोरोना वीरांचा सन्मान केला आहे. या गौराईसमोर अकलूज येथे उभारलेले कोविड हॉस्पिटल, अकलूजच्या सीमेवर उभारलेले पोलीस, कोरोनाचे संकट आणि अशा संकटात विशाखापट्टणम येथील सुजाण या महापालिका आयुक्त आपल्या एक महिन्याच्या बाळासह कोरोना सेवेत असल्याचा देखावा देखील उभारला आहे. देशमुख कुटुंबातील मुलगी व मुलगा दोघेही डॉक्टर असल्याने ते सध्या कोरोनाच्या सेवेमुळे सणाला घरी येऊ शकले नाहीत. अशा असंख्य कोरोना योद्ध्यांसाठी देशमुख कुटुंबाच्या गौराई या कोरोना योध्याच्या रूपात आल्या असून गौराईच्या आगमनाने हे भयावह कोरोनाचे संकट दूर व्हावे हीच प्रार्थना मोहनराव व संगीता देशमुख करीत आहे.