मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका करुन अज्ञातवासात गेलेल्या महादेव जानकर यांनी पुढचे तीन दिवस आपण काहीही बोलणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. एबीपी माझाने त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

महादेव जानकर यांना बडतर्फ करा : धनंजय मुंडे


मात्र यावेळी आपण कुठे आहोत, हे सांगणही महादेव जानकर यांनी टाळलं.

दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र जानकरांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत आंदोलन सुरु केलं आहे. जानकरांना मंत्रिमंडळातून तातडीने बडतर्फ करावं, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

जानकरांच्या विधानानंतर राष्ट्रवादी-रासप कार्यकर्त्यांमध्ये घमासान


जानकरांची अजित पवार आणि राष्ट्रवादीवर टीका

दसरा मेळाव्याला भगवानगडावर काल भाषण करताना रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी, अजित पवार आणि धनंजय मुंडेवर आक्षेपार्ह टीका केली होती. "बारामतीची वाट लावणार आहे. बारामतीची सुपारी घेणाऱ्यांची वाट लावणार आहे. बारामतीचं वाटोळे केल्याशिवाय शांत बसणार नाही," असा घणाघात जानकरांनी अजित पवारांवर केला. त्याविरोधात राज्यभर विविध ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत.

‘बारामती’चं वाटोळं केल्याशिवाय शांत बसणार नाही : महादेव जानकर


जानकरांना बडतर्फ करा : मुंडे

महादेव जानकर यांना बडतर्फ करा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. यासंदर्भात राज्यपालांना पत्र लिहिणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. एमएलसी म्हणजे मुख्यमंत्र्यांचा लॉयल चमचा, असा उल्लेख करत महादेव जानकरांनी विधानपरिषद, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्याचा अपमान केला. यासंदर्भात आम्ही राज्यपालांकडे तक्रार करुन त्यांना बडतर्फ करण्याची मागणी करणार आहोत, असंही मुंडे म्हणाले.

बारामती हॉस्टेलमध्ये घुसून पवारांच्या फोटोवर शाईफेकीचा प्रयत्न