'बारामती'चं वाटोळं केल्याशिवाय शांत बसणार नाही : महादेव जानकर
एबीपी माझा वेब टीम | 11 Oct 2016 04:20 PM (IST)
अहमदनगर : बारामतीचे वाटोळं केल्याशिवाय शांत बसणार नाही, असे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर घणाघात केला. भगवानगडावरील दसरा मेळाव्यात जानकरांनी अजित पवारांसह विरोधकांवर तोफ डागली. पंकजा मुंडे यांच्या आपण पाठीशी असल्याचं सांगताना महादेव जानकर म्हणाले, "पंकजाताईंच्या बरोबर राष्ट्रीय समाज पक्ष आहे, हे सांगण्यासाठी इथे आलो आहे. आज पंकजाताईंचा विजय झाला आहे." शिवाय, मुंडेसाहेबांनी आम्हाला मोठं केलंय. पंकजाताईंना कोणाच्या भिकेची गरज नाही, असेही यावेळी जानकर म्हणाले. "बारामतीची वाट लावणार आहे. बारामतीची सुपारी घेणाऱ्यांची वाट लावणार आहे. बारामतीचं वाटोळे केल्याशिवाय शांत बसणार नाही." असा घणाघात जानकरांनी अजित पवारांवर केला. दरम्यान, अजित पवारांकडून जानकरांच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, "जानकरांना आजच्या दिवसाचं महत्त्व माहित नाही. त्यामुळे जानकरांना कधी उत्तर द्यायचं, याचं शहाणपण मला आहे.", असे धनंजय मुंडे 'एबीपी माझा'शी बोलताना म्हणाले.