बीड : ‘महादेव जानकर, यू आर दि मिनिस्टर’ याची जाणीव ठेवून संयमाने बोलतो. विशेषत: मीडियाशी बोलताना काळजी घेऊन बोलतो, असे रासपचे अध्यक्ष आणि राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जनाकर म्हणाले. जानकर मराठवाड्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार करत आहेत. त्यावेळी सभेनंतर बीडमधील अंबाजोगाईत ते बोलत होते.


“मी चळवळीतला कार्यकर्ता असल्याने बोलण्याच्या ओघात अनेकदा चुका केल्या आहेत. परंतु, आता मंत्री असल्याने संयमी झालो आहे. एखादं वाक्य अनावधानाने बोललो की लगेच माझा निषेध, आमचे पुतळे जाळणे असे प्रकार होतात. त्यामुळे आता बोलताना 'महादेव जानकर, यू आर दि मिनिस्टर' याची जाणीव ठेऊन संयमाने बोलतो. विशेषत: मीडियाशी बोलताना खूप काळजी घेऊन बोलतो.”, असे पदुम मंत्री महादेव जानकर म्हणाले.

“मुंडे साहेबांच्या पश्चात भाजपमध्ये जबाबदारीने संघटन करणारा नेता नाही, त्यामुळे मित्र पक्षांची कुचंबणा होत आहे. परंतु, आम्ही सर्व मित्र पक्ष बसून यावर मार्ग काढू.”, असेही जानकर म्हणाले.

नोटाबंदीवर जानकर काय म्हणाले?

“ज्यांच्याकडे दोन नंबरचा पैसा होता, त्यांनाच नोटाबंदीचं वाईट वाटतंय. काळा पैसा काही सर्वसामान्य, शेतकऱ्यांकडे नव्हता. त्यामुळे त्यांच्या नाराजीचं कारणच नाही. लाईनमध्ये उभं राहणे, बियाणे विकत घेण्यात अडचणी आल्या, पण आता सर्व ठीक आहे. मी चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरतोय, पण लोक नोटाबंदीबद्दल सरकावर नाराज असल्याचे कुठेही जाणवत नाही. नोटाबंदीचा परिणाम सरकावर पडलेला नाही.”, असे सांगायलाही जानकर विसरले नाहीत.