महाड दुर्घटना : बुडालेली दुसरी एसटी बस सापडली
एबीपी माझा वेब टीम | 13 Aug 2016 05:37 AM (IST)
महाड : महाड दुर्घटनेतील सावित्री नदीच्या पात्रात बुडालेली अपघातग्रस्त दुसरी एसटी बस अखेर सापडली आहे. तब्बल 11 दिवसांनी नौदलाच्या जवानांना बेपत्ता एसटीचा शोध लागला आहे. दुर्घटनास्थळापासून 500 मीटर अंतरावर एसटी सापडली आहे. नौदलाचे जवान पाणबुडीच्या सहाय्याने पहाटे पाच वाजल्यापासून शोध घेत होते. शोधकार्यादरम्यान, 500 मीटर अंतरावर एसटी असल्याची खात्री पटली. त्यामुळे आता ही एसटी बाहेर काढण्यासाठी वायर रोप आणि क्रेन मागवण्यात आल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी राजापूर-बोरीवली एसटी दुर्घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर सापडली होती. क्रेनच्या सहाय्याने ही एसटी सावित्रीच्या पात्रातून बाहेर काढण्यात आली होती. आता या दुर्घटनेतील दुसरी जयगड-मुंबई ही एसटी शोधण्यात नौदलाला यश आलं आहे. ब्रिटिशकालीन महाड-पोलादपूर पूर कोसळून दुर्घटना रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीच्या पुरात, मुंबई-गोवा महामार्गावरील, महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन पूल मंगळवारी 2 ऑगस्टच्या रात्री साडेअकरा वाजता वाहून गेला. या पुरात 2 बस आणि 7 ते 8 वाहनं वाहून गेले. यामधील 27 मृतदेह शोधण्यात जवानांना यश आलं आहे. या दुर्घटनेत 42 जण वाहून गेल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती.