रायगड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्या केल्याप्रकरणी अटक झालेल्या नारायण राणे यांना रायगड कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयीन कोठडीची गरज नसल्याचं म्हणत न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. पोलिसांनी कोर्टात 7 दिवसांची कोठडीची मागणी केली होती. मात्र कोर्टाने ती नाकारली. भविष्यात असे प्रक्षोभक वक्तव्य करू नये असे लिहून देण्याची मागणीही पोलिसानी कोर्टात केली होती.
नारायण राणे यांच्यावर पोलिसांनी लावलेली कलमे चुकीची आहेत. पोलीस तपासासाठी दिलेली कारणे देखील योग्य नाहीत. नारायण राणे यांना अटक करण्यापूर्वी पोलिसांनी कोणतीही लेखी नोटीस दिली नाही, असा युक्तिवाद नारायण राणे यांच्या वकीलांनी केला.
नारायण राणेंना जामीन मिळाल्यानंतर राणे समर्थकांनी सिंधुदुर्गात जल्लोष केला. सुनावणीवेळी नारायण राणे यांच्या पत्नी, नितेश राणे, निलेश राणे, भाजप कार्यकर्ते कोर्टात आणि कोर्ट परिसरात हजर होते.
काय म्हणाले होते नारायण राणे?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. दरम्यान या यात्रेला सुरूवात झाल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. पण, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांची जीभ घसरली आहे. रायगडमधील महाड येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी राणे यांना पत्रकारांनी मंदिरे बंद यासह तिसऱ्या लाटेवर प्रश्न विचारले. त्यानंतर नारायण राणे यांची जीभ घसरली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकेरी उल्लेख केला. 'आमचे काही अॅडव्हायझर नाहीत? तिसरी लाट कुठून येणार हे याला कुणी सांगितलं? लहान मुलांना कोरोना होणार आहे, अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. तसेच स्वातंत्र्यदिनाबद्दल माहिती नसणाऱ्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्यदिन कोणता हे माहित नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती' असं नारायण यांनी म्हटलं. दरम्यान, यात्रा सुरूवातीपासून राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केले आहेत. पण, महाड येथील विधानानंतर आता मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संबंधित बातम्या
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा काँग्रेस नेत्यांकडूनही समाचार, कोण काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रकरणावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..