महाड: महाड पूल दुर्घटनेत बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाईकांनी आता आशा सोडून दिली आहे. आज सावित्री नदीच्या तीरावर मृतांच्या नातेवाईकांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. सावित्री नदीत पूल खचून झालेल्या दुर्घटनेला 10 दिवस पूर्ण झाले आहेत.

 

गेले 10 दिवस मृतांचे नातेवाईक मृतदेह सापडतील अशी आशा ठेवून सावित्रीच्या काठावरच मुक्कामी होते. मात्र, आतापर्यंत 26 जणांचे मृतदेह सापडले असून शोधकार्य आजही सुरूच आहे. मात्र आता मृतांच्या नातेवाईकांनीही मृतदेह सापडतील अशी आशा सोडली आहे.

 

दरम्यान, काल दोन एसटी बसपैकी राजापूर-बोरिवली बसला सावित्रीच्या पात्रातून बाहेर काढण्यात आलं. अजूनही दुसरी बस आणि तवेरा गाडीचा शोध सुरू आहे. महाडमध्ये गेल्या १० दिवसांपासून मुक्कामी असलेल्या मृतांच्या नातेवाईकांनी आता परतीचा मार्ग स्वीकारला.

 

ब्रिटिशकालीन महाड-पोलादपूर पूर कोसळून दुर्घटना

 

रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीच्या पुरात, मुंबई-गोवा महामार्गावरील, महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन पूल मंगळवारी  2 ऑगस्टच्या रात्री साडेअकरा वाजता वाहून गेला.  या पुरात 2 बसेस आणि 7 ते 8 वाहनं वाहून गेले. यामधील 27 मृतदेह शोधण्यात जवानांना यश आलं आहे.

 

या दुर्घटनेत 42 जण वाहून गेल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती.

 

महाड आणि पोलादपूर या दोन शहरांना जोडणारा हा ब्रिटीशकालीन पूल होता. पुलावरुन जाणाऱ्या दोन एसटी बसेससह सात ते आठ वाहनंही वाहून गेली. वाहनांमध्ये राजापूर-बोरीवली आणि जयगड-मुंबई या दोन एसटी बसेसचा समावेश आहे.

 

साधारणपणे 100 वर्षांपासून या पुलावरुन वाहतूक सुरु होती. कोकणाहून मुंबईकडे येणारी वाहनं या पुलावरुन जायची. मात्र, पुलाची दुरावस्था आणि कोकणात सुरु असणारा पाऊस यामुळे हा पूल मध्यरात्री वाहून गेला.

 

शोध आणि बचावकार्य

 

दुर्घटना झाल्यानंतर शोध आणि बचावकार्य जोरात सुरु आहे. एनडीआरएफ, नौदल, तटरक्षक दल, रेल्वे आदी विविध पथकाचे जवान शोधकार्य करत आहेत.