Pune bypoll election : कसबा मतदारसंघासाठी (kasba by election) सध्या महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु असल्याचं चित्र आहे. एकाच जागेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेने दावा केला आहे. तिन्ही पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची मोठी यादी तयार झाली आहे. त्यामुळे कसब्यात आता महाविकास आघाडीकडून कोणाला नेमकी उमेदवारी मिळते हे पाहणं रंजक असणार आहे.
निवडणूक जाहीर होताच कॉंग्रेसने आणि शिवसेनेने इच्छुक असल्याचं बोलून दाखवलं आहे. त्यात आता राष्ट्रवादीच्या डझनभर इच्छुक उमेदवारांची यादी आहे. शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची यासंदर्भात पुण्यात बैठक झाली. या बैठकीत एकूण दहा इच्छुकांची नावं प्रदेशाकडे पाठवण्याचा निर्णय झाला आहे. कसबा मतदारसंघ जरी भाजपचा पारंपारिक मतदारसंघ असला तरी या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची मोठी ताकद आहे. त्यात कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून अंकुश काकडे, अण्णा थोरात, रवींद्र माळवदकर, गणेश नलावडे, वनराज आंदेकर, रुपाली पाटील, शिल्पा भोसले, दत्ता सागरे या प्रमुख नावासह एकूण 10 इच्छुकांची नावं आहेत. त्यांची नावं प्रदेश कार्यलयात पाठवण्यात आली आहेत. महाविकास आघाडीचे तिनही पक्ष सध्या कसब्यातील जागेवर दावा करत आहेत.
कॉंग्रेसकडून कोण इच्छुक?
कसब्याच्या जागेसाठी कॉंग्रेसकडूनही जोरदार तयारी सुरु आहे. कॉंग्रेसमध्येही अनेक इच्छुक उमेदवारांची यादी मोठी आहे. आमदार संग्राम थोपटे यांनी 16 जणांच्या ऑनलाईन मुलाखती घेतल्या. यात अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे, नीता रजपूत, संगिता तिवारी, विजय तिकोणे आणि इतर इच्छुकांचा समावेश आहे.
भाजपकडून बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न
कसबा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहे. कसबा मतदारसंघातच नाही तर चिंचवड मतदारसंघात देखील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप नेते कामाला लागले आहेत. भाजपतर्फे सर्वपक्षीयांंना बिनविरोध निवडणूक करण्याच्या मागणीचं पत्र पाठवण्यात आलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच पुणे शहरातील सर्व पक्षांच्या अध्याक्षांना पत्र देण्यात आलं आहे. त्याशिवाय शहरातील पक्षांच्या अध्यक्षांना पत्र पाठवण्यात आलं आहे. दोन्ही मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारपासून (31 जानेवारी) सुरु झाली. पहिल्याच दिवशी कसबा विधानसभेत 16 उमेदवारांनी 27 अर्ज नेले आहेत. मात्र अजून कोणीही अर्ज भरला नसल्याचं जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.