शिर्डी : दिवाळीतील पाडव्याच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारने राज्यातील सर्व धार्मिक स्थळं सुरु करण्यास परवानगी दिली. त्यानंतर शिर्डीतील साई मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. एरवी 50 हजार भक्त दररोज शिर्डीत दर्शन घेत असत, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला 6 हजार भविकच दर्शन घेऊ शकणार असल्याचं मंदिर प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलं होतं. परंतु, सोशल डिस्टंन्सिंगचा बोजवारा उडत असल्यामुळे आता मात्र गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मंदिर प्रशासनाने कंबर कसली आहे.


शिर्डीत गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता नवे नियम करण्यात आले आहेत. एका दिवसांत जास्तीत जास्त आठ हजार भक्तांनाच दर्शन देण्यात येणार आहे. तसेच पास मिळाल्यानंतरच शिर्डीत येण्याचं आवाहन साई संस्थानाकडून भक्तांना करण्यात आलं आहे. तिरुपती बालाजी मंदिर संस्थानच्या धर्तीवर केवळ ऑनलाईन पास असणाऱ्या भाविकांनाच दर्शन दिलं जाणार असल्याच काही दिवसांपूर्वी मंदिर प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं होतं.


गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांसंदर्भात शिर्डी साई संस्थानाचे सीईओ कान्हूराज बगाटे यांनी एबीपी माझाशी बातचित केली. त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, 'मंदिर भाविकांसाठी सुरु केल्यानंतर सुरुवातीच्या नियोजनानुसार, केवळ 6 हजार भक्तांना दर्शन दिलं जात होतं. त्यानंतर दर्शनासाठी भाविकांची वाढलेली गर्दी पाहायला मिळाली. त्यानंतर मंदिर संस्थानाने 8 हजार भाविकांना दर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'भाविकांची संख्या वाढवल्यानंतर स्वच्छतेची आणि सॅनिटायझेशनचीही काळजी घेण्यात येत आहे.' तसेच यावेळी पास मिळाल्यानंतरच शिर्डीत येण्याचं आवाहन बगाटे यांनी केलं आहे. तर ज्यांच्याकडे ऑनलाईन दर्शन पास असेल त्यांनाच दर्शन मिळणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.


दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेली राज्यातील मदिरं सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. मात्र मंदिर खुली झाली तरी कोरोनासंदर्भातील खबरदारी म्हणजे मास्क, हँड सॅनिटायजर, सोशल डिस्टन्सिंग यांचं पालन करणं भाविकांना बंधनकारक असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचं सर्वांनीच स्वागत केलं आहे.