मुंबई : राज्यात भाजपकडून पहिली यादी जाहीर झाल्यानंतर आता महाविकास आघाडीकडून सुद्धा जागा वाटपासाठी उद्याच बैठक बोलावण्यात आली आहे. महाविकास आघाडीची जागा वाटप संदर्भात उद्याच बैठक मुंबईमध्ये बोलावण्यात आली असून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सोडून मुंबईसाठी तातडीने रवाना झाले आहेत.
बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण नाही
या बैठकीमध्ये जागावाटपावर महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण देण्यात आलेलं नाही. पहिल्यांदा हे तिन्ही पक्ष वंचितकडून देण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा करतील आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीशी चर्चा केली जाणार आहे. उद्या मुंबईमध्ये हॉटेल ट्रायडंटमध्ये ही बैठक होणार असून या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून संजय राऊत उपस्थित राहणार आहेत.
वंचितच्या प्रस्तावावर चर्चा होणार
काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह केसी वेणुगोपाल सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जयंत पाटील बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत. ज्या जागांवरती तिन्ही पक्ष आग्रही आहेत. त्या संदर्भात पुन्हा एकदा बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीला जागा किती सोडायच्या यावरून महाविकास आघाडीमध्ये मतमतांतरे आहेत. मात्र, वंचितला चार जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अनुषंगाने सुद्धा बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजपकडून 20 उमेदवार जाहीर करण्यात आल्याने किमान या मतदारसंघांमधील महाविकास आघाडीकडून आपापले 20 उमेदवार निश्चित केले जाऊ शकतात.
इतर महत्वाच्या बातम्या