नाशिक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो न्याय यात्रा केवळ महाराष्ट्राच्या फायद्यासाठी नसून देशाच्या फायद्यासाठी असल्याचे मत, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. मणिपूरपासून सुरू झालेली यात्रा नाशकामध्ये प्रचंड जल्लोषात पोहचली, सर्वत्र जल्लोष पाहायला मिळाला, ठिकठिकाणी राहुल गांधी यांचं स्वागत करण्यात आल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. दरम्यान राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नाशकामध्ये पोहोचली आहे. नाशिकमध्ये आज त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेतले, आज त्यांची यात्रा नाशकामध्ये मुक्काम करणार आहे.
16 मार्च रोजी यात्रेचा समारोप होणार
दरम्यान, 17 मार्च रोजी इंडिया आघाडीची भव्य सभा होणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. तत्पूर्वी, 16 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस्थळी चैत्यभूमी येथे भारत जोडो यात्रेचा समारोप होणार आहे.
बाळासाहेब थोरात यांनी जागावाटपावरती भाष्य केले. ते म्हणाले की, दोन चार गोष्टींवरती चर्चा होणं बाकी असून आम्हाला त्याची माहिती आहे, कोणाच्या कोट्यात कोणत्या जागा आहेत हे माहीत असल्याने आम्ही कामाला लागलो आहोत. फक्त यादी जाहीर होणं बाकी आहे. बाळासाहेब थोरात यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नाराजीवरही भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की आता नाराजीचा प्रश्न येत नाही. अशी वेळ आली की देश आपल्याला पुढे कोणत्या पद्धतीने न्यायचा आहे, पुढे लोकशाही राहणार की नाही, राज्यघटना राहणार की नाही असे प्रश्न उपस्थित होत असताना आता सर्वांनी एकत्र यायला हवं आणि हीच भावना त्यांच्या मनामध्ये आहे.
भारतीय जनता पक्ष घाबरलेल्या अवस्थेत
थोरात यांनी भाजपच्या दुसऱ्या उमेदवारी यादीवर भाष्य केले ते म्हणाले की असे वाटले की काहीतरी नवीन होईल. मात्र, नवीन करण्याचं काही धाडस नाही. भारतीय जनता पक्ष घाबरलेल्या अवस्थेत आहे ही वस्तुस्थिती आहे, असा दावा त्यांनी केला. जागा वाटपावरून महायुतीमध्ये भूकंप होणार असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार असून लोक पुन्हा काँग्रेसकडे, आघाडीमध्ये येत आहेत. जनतेची भावना आघाडीच्या बाजूने असल्याचा दावा बाळासाहेब थोरात यांनी बोलताना स्पष्ट केला.
तर निश्चितच विजयी होतील
दरम्यान आमदार निलेश लंके यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी जर ते अहमदनगर दक्षिणमधून लढल्यास तर निश्चितच विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी खूप लोकप्रियता मिळवली आहे, काम करणारे तरुण असे त्यांचे उदाहरण असल्याचे ते म्हणाले. ते मतांनी विजयी होतील असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या