Jitendra Awhad Vs Shiv Sena: नवी मुंबई महापालिका निवडणूक (Navi Mumbai Municipal Corporation) लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) आतापासून कंबर कसली आहे. दरम्यान, ऐरोली येथे घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मार्गदर्शन केलं. मात्र, यावेळी त्यांनी शिवसेना (Shiv Sena) आणि अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केलीय. "मोठा भाऊ म्हणून आदर करु, मात्र बोलायचे एक आणि करायचे एक हे खपवून घेतलं जाणार नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. मौका सभी को मिलता है. त्यामुळं आम्ही कुणाबरोबर जायचं याचे पर्याय खुले आहेत,” असाही इशारा जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला दिलाय. 


महाविकास आघाडीचं सरकार सुरळीत सुरू असले तरी स्थानिक पातळीवर सर्व काही अलबेल नसल्याचे संकेत आव्हाड यांनी दिले आहेत. "निवडणुका जवळ आल्या की सत्ताधारी शिवसेना वॉर्ड रचनेत मनमानी करते. आपल्याला निवडणूक जिंकता यावी, यासाठी शिवसेना मनपा अधिकारी , निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्याला सोईस्कर होईल अशा पद्धतीनं वार्ड रचना करून घेते. हा अनुभव आम्हाला ठाण्यात आला होता. जर अशी मनमानी कृत्य करून वार्ड रचना पाडली जात असेल तर ही लोकशाहीला घातक असून याकडे निवडणूक आयोगाने लक्ष दिले पाहिजे", अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.


“आम्ही आघाडी धर्म पाळून विरोधी पक्षात असलेल्या भाजपा आमदार गणेश नाईक यांच्यावर टीका करायची. मात्र, तुम्ही पडद्यामागून संबंध ठेवायचे. मग आम्ही शत्रुत्व का घ्यायचं? राजकारणातील गणिते कधीही बदलू शकतात. मौका सभी को मिलता है. त्यामुळं आम्ही कुणाबरोबर जायचं याचे पर्याय खुले आहेत, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला दिलाय.


जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या व्यक्तव्यावर शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आलीय. एकीकडे आघाडी करून महानगरपालिका लढणार असल्याचे संकेत दिले जात असताना दुसरीकडे शिवसेनेवर जाहीर टिका केली जात असेल तर आघाडीत बिघाडी होईल असा प्रतिइशारा शिवसेनेकडून देण्यात आलाय. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-