मुंबई : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर झाला. मात्र हा अर्थसंकल्प सादर सभागृहात सादर होण्यापूर्वीच फुटला असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. हा सभागृहाचा आणि सदस्यांचा अवमान असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी अर्थसंकल्प सुरु असताना सभात्याग करत निषेध व्यक्त केला.


अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्विटर अकाउंटवरून फुटलाय. जबाबदारीच्या पदावर असताना त्यांच्याकडून ही चूक घडणे दुर्दैवी बाब आहे. सभागृहाचा हा अपमान आहे. सरकारने सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी विधानसभेत राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी तर विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.


महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं आहे. एकीकडे अर्थमंत्री बजेट सादर करत होते आणि दुसरीकडे ट्विटरवरून जाहिरातींसह अर्थसंकल्प पोस्ट होत होता. हे निषेधार्ह असून अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.


अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप करत विरोधकांनी सुधीर मुनगंटीवारांचं भाषण सुरू असताना गोंधळ घातला. यावेळी अजित पवारांनी अर्थसंकल्पाच्या  प्रती दाखवत सभागृहात आक्षेप नोंदवला. सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प मांडत असताना, त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर अर्थसंकल्पातले मुद्दे ग्राफिक्ससह पोस्ट होत होते. त्यावर बोट ठेवत विरोधकांनी अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप केला. दरम्यान ज्यावेळी हा गोंधळ सुरू होता. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार ओबीसीसंदर्भातल्या योजनांचं वाचन करत होते. त्यामुळं ओबीसींच्या हक्कांची घोषण करताना विरोधक बाधा आणत असल्याचा पलटवार सुधीर मुनगंटीवारांनी केला.



अर्थसंकल्प ट्विटरवर फुटण्याच्या आरोपाचं मुख्यमंत्र्यांकडून खंडन

सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प दोन वाजता मांडायला सुरुवात केली. आणि या अर्थसंकल्पाच्या संदर्भात पहिला ट्वीट 2.16 ला पहिला ट्विट पडला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.  अर्थसंकल्प फुटलेला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.  नवीन तंत्रज्ञान आणि नवीन माध्यमांचा अंगीकार विरोधकांनी करावा. आम्ही सकारात्मक कामासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करतो. विरोधक मात्र याचा केवळ आमच्यावर टीका करण्यासाठीच वापर करतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 Maha Budget 2019 : राज्याचा अर्थसंकल्प सादर, बजेटमधील महत्त्वाचे मुद्दे