पंढरपूर : नवीन वर्षातील वारकरी संप्रदायाच्या पहिल्या यात्रेच्या मार्गातही कोरोनाचे काटे असल्याचं पाहायला मिळत होतं. लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यामुळं माघी यात्रेवरही अनिश्चिचिततेचे सावट होतं अखेर ही वारी रद्द करण्याचाच निर्णय घेण्यात आला.


कोरोना विषाणूच्या संकटामुळे मागील साधारण वर्षभरापासून जगण्याचीच परिभाषा बदलली. वारकरी संप्रदारायासाठीही हे संपूर्ण वर्ष काही सोपं गेलं नाही. सर्वात मोठी असलेली आषाढी यात्रा त्यानंतर ३ वर्षातून येणारा अधिक मास आणि कार्तिकी यात्रा हे सर्व सोहळे कोरोनामुळे रद्द झाले होते .


यातच आता भर पडली आहे. वाईट आठवणींचं 2020 हे वर्ष सरलं असलं तरीही नव्या वर्षात म्हणजेच 2021 च्या सुरुवातीला येऊ घातलेली वारकरी संप्रदायाची पहिली यात्रा पुन्हा कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर 22 आणि 23 फेब्रुवारीला पंढरपूरातील विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद असणार आहे. चार प्रमुख वाऱ्यांपैकी एक असणाऱ्या माघ वारीच्याच वेळी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंढरपूर मंदिर संस्थानचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याबाबतची माहिती दिली.


एका बाजूला कोरोनावरील लसीकरणाला देशभर सुरुवात झाली असताना अजूनही कोरोनाचे संकट संपले नसल्याने राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यातही लॉकडाऊन घोषित केला आहे. यादरम्यानच वारकरी संप्रदायाची माघी यात्रा 23 फेब्रुवारी रोजी होत असून कोरोनाच्या नियमानुसार कोणत्याही यात्रा जत्रा भरण्यास परवानगी नसल्याने या यात्रा रद्द करण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे.