गोंदिया : गोंदियाचा रखडलेला विकास पूर्ण करायचा असेल, तर जिल्ह्याला मध्य प्रदेशमध्ये समाविष्ट करा, असं वक्तव्य मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलं. माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नदीच्या पाण्याच्या साठवणुकीबद्दल केलेल्या मागणीला कमलनाथ यांनी उत्तर दिलं. पटेल हे गोंदियाचे माजी खासदार आहेत.


गोंदियातील डांगुरली हे गाव महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात आहे. या गावाजवळून वैनगंगा आणि बाघ नदी असल्यामुळे बॅरेजच्या माध्यमातून पाण्याची साठवणूक केल्यास सिंचन आणि पिण्यासाठी दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होईल, याबाबत कमलनाथ यांनी काही ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भाषणातून केली होती. गोंदिया जिल्ह्याला मध्य प्रदेशसोबत जोडल्यानंतर हा प्रश्न सुटेल, असं उत्तर कमलनाथ यांनी दिलं.

स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त शालेय आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक वितरण कार्यक्रमात कमलनाथ बोलत होते. या कार्यक्रमाला अभिनेता संजय दत्तही उपस्थित होता. संजय दत्तला पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती.

संजय दत्त यांनी फिल्मी डायलॉग मारत श्रोत्यांची मनं जिंकली. आपल्या वाईट काळात प्रफुल्ल पटेल यांनी खूप साथ दिली आहे. आपण पटेल यांचे ऋणी असून त्यांच्यासाठी जीवही देऊ, असं संजय दत्त म्हणाले. गोंदिया जिल्ह्यात फिल्म इंडस्ट्री निर्माण व्हावी, अशी मागणीही त्याने प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केली