पंढरपूर : माझं वय झाल्यामुळे मी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवू नये, असं सुचवू पाहणाऱ्या भाजप नेत्यांनी माझ्या तब्येतीची काळजी करु नये, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पवारांना सल्ला दिला होता.

माढा लोकसभेतून लढण्याबाबत विचार करु, असं म्हणत शरद पवारांनी पुन्हा लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे माढ्यातून विजयसिंह मोहिते-पाटलांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

शरद पवार जर माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत उभे राहिले, तर भाजप त्यांचा पराभव करेल, असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला होता. आमची संघटनात्मक रचना अशी आहे, की आम्ही शरद पवारांचा पराभव करु शकू. पण ते बारामतीत उभे राहिले, तर आम्हाला कठीण आहे, असं पाटील म्हणाले होते.

दरम्यान, लोकसभेच्या 48 पैकी 44 मतदारसंघांतील जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती शरद पवारांनी दिली. प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीशी राज्यातील नेते चर्चा करत आहेत. जागा वाढवून घेण्यासाठी प्रयत्न होत असतात, असं पवार म्हणाले.

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींच्या नावाची चर्चा पंतप्रधानपदासाठी सुरु झाली, यात आनंद आहे. कारण ते माझे मित्र आहेत, अशा भावना शरद पवारांनी व्यक्त केल्या. पण आता मला त्यांची काळजी वाटू लागली आहे, असंही पवार म्हणाले.

राज ठाकरे काही प्रश्नावर आमच्या सोबत असले तरी निवडणुकीत एकत्र नसतील, असं सांगत मनसे-राष्ट्रवादी यांची आघाडी होण्याच्या चर्चांवर खुद्द पवारांनी पडदा टाकला.