Ranjit Singh Shinde met Manoj Jarange Patil : मागील 35 वर्षापासून बबनदादा शिंदे हे माढा विधानसभेचे आमदार आहेत. ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत. आज आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे (Ranjit Singh Shinde) यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. रणजितसिंह शिंदे हे माढा विधानसभेतून यावेळेला निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.


रणजितसिंह शिंदे नेमके कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार


काही दिवसापूर्वी बबनदादा शिंदे आणि रणजितसिंह शिंदे यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली होती. आज मनोज जरांगे यांच्या भेटीनंतर रणजितसिंह शिंदे नेमके कोणत्या चिन्हावर निवडणूक लढविणार याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत माढ्यातून शिंदे यांचे विरोधक आणि शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांना 55 हजार मतांची आघाडी मिळाल्याने यावेळी शिंदे यांचे सीट धोक्यात असल्याची चर्चा आहे. माढा लोकसभेत मनोज जरांगे यांचा चमत्कार दिसल्याने महायुतीला येथे मोठा पराभव पत्करावा लागला होता. यामुळे यंदा महायुतीच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास अनेक दिग्गज आमदार तयार नसल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. अशातच रणजितसिंह शिंदे यांनी आज घेतलेली भेट हा त्याचाच एक भाग असल्याचं बोललं जात आहे.




मनोज जरांगे इच्छुकांचे अर्ज गोळा करत असतानाच रणजितसिंह शिंदे भेटीला


मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळेला रणजितसिंह शिंदे यांना निशाणा करायचा प्रयत्न काही विरोधकांनी केला होता. यातूनच त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. तसेच आपला त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याची ग्वाही रणजितसिंह शिंदे यांनी दिली होती. दरम्यान, आज त्यांच्यासोबत मनोज जरांगे यांचे निकटवर्तीय धनाजी साखळकर माने हे देखील उपस्थित होते. एका बाजूला मनोज जरांगे हे या विधानसभेला उमेदवार उभे करण्यासाठी इच्छुकांचे अर्ज गोळा करत असताना रणजितसिंह शिंदे यांच्या भेटीमुळे नवी चर्चा सुरू झाली आहे.


दरम्यान, आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे माढा विधानसभा मतदारसंघातून यावेळी विधानसभेची निवडणूक लञवणार आहेत. तशी त्यांनी तयारी देखील सुरु केली आहे. सध्या ते गावोगावी जाऊन नागरिकांच्या गाठी भेट घेत आहे, त्यांचे विविध प्रश्न समजावून घेत आहेत.


महत्वाच्या बातम्या:


मोठी राजकीय उलथापालथ, पृथ्वीराज चव्हाण अंतरवालीत; मनोज जरांगेंशी चर्चा, नेमकं काय घडलं?