मुंबई: आधी माजी आयएएस अधिकारी आनंद कुलकर्णी आणि आता विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश. लॉटरी घोटाळ्यामध्ये थेटपणे आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालल्यानं माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या अडचणींमध्ये भर पडत चालली आहे.

 

लॉटरी घोटाळा जनतेसमोर आल्याचं समाधान व्यक्त करणारी एक पोस्ट कृष्णप्रकाश यांनी फेसबुकवर टाकली आहे.

 

ऑनलाईन लॉटरी सोडतीच्या मर्यादांचं सर्रास उल्लंघन झाल्याचा दावा कृष्णप्रकाश यांनी केला आहे. शिवाय लॉटरी किती अंकी असावी याचंही बंध पाळलं नसल्याचा आरोप कृष्णप्रकाश यांनी केला आहे. बुलडाण्यामध्ये कार्यरत असताना कृष्णप्रकाश यांनीच सर्वात आधी या लॉटरी घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. पण त्यानंतरही या घोटाळ्याला सरकारनं दडपून टाकल्याचा आरोप आनंद कुलकर्णी यांनी केला आहे.

 

इतकंच नाही, तर लॉटरीद्वारे कसा पैसा उकळला गेला, याचा तपशीलही कृष्णप्रकाश यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरून दिला आहे.



 

माजी सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी लॉटरी घोटाळ्यात तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांचं नाव घेऊन खळबळ उडवून दिली होती. हे सर्व आरोप जयंत पाटील यांनी फेटाळून लावले होते.

 

विशेष पोलीस निरीक्षक कृष्णप्रकाश आणि जयंत पाटील यांच्यात सुरुवातीपासूनच वाद होते. त्याचंच उट्ट काढत कृष्णप्रकाश यांनी ही फेसबुक पोस्ट टाकल्याचं बोललं जात आहे.

 

जयंत पाटील - कृष्णप्रकाश जुना वाद

 

*दाद्या सावंत या गुंडाला घेऊन जयंत पाटील सांगलीचे तत्कालीन एसपी कृष्णप्रकाश यांच्या केबिनमध्ये गेले होते, त्यावरुन या दोघांमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली.

 

*2009 मध्ये मिरजमध्ये झालेली दंगल तत्कालीन महापौर मैनुद्दीन बागवान यांनीच भडकावल्याचा आरोप तत्कालीन सांगलीचे एसपी कृष्णप्रकाश यांनी केला होता.

 

*मैनुद्दीन बागवान हे जयंत पाटलांचे जवळचे कार्यकर्ते मानले जातात.

 

*कृष्णप्रकाश यांच्या आरोपांमुळे तत्कालीन गृहमंत्री असलेल्या जयंत पाटलांच पद धोक्यात आलं होतं.

 

*कृष्णप्रकाश यांनी केलेले आरोप राजकीय हेतुपुरस्सर असल्याचा दावा जयंत पाटलांनी केला होता...

 

*ऑनलाईन लॉटरी घोटाळ्याचा अहवाल सर्वात आधी अडिशनल डीजी शिवप्रताप यादव यांनी दाखल केला होता...त्यानंतर कृष्णप्रकाश यांनी या प्रकऱणी तपास केला होता.

 

काय आहे घोटाळा?

 

ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून महाराष्ट्रात अब्जावधींचा घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट माजी सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी केला. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत कुलकर्णी यांनी तत्कालीन सरकारमधल्या राष्ट्रवादीच्या जयंत पाटील आणि तत्कालीन लॉटरी आयुक्त कविता गुप्ता यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला आहे.

 

संबंधित बातम्या : आघाडीच्या काळात अब्जावधींचा ‘लॉटरी घोटाळा’?


 

लॉटरी ऑनलाईन झाल्यानंतर 2001 पूर्वी महाराष्ट्र राज्य लॉटरीतून राज्याला मिळणारा अब्जावधींचा महसूल, अवघ्या काही कोटींवर आल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला.

 

अहवाल दडपल्याचा जयंत पाटलांवर आरोप

 

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या कथित घोटाळ्याच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले होते. पण जयंत पाटील यांनी या प्रकरणाचा अहवाल दडपल्याचा दावाही केला जातो आहे.

 

काय आहेत आहवालातले आक्षेप?


 

  • कायद्याचे उल्लंघन करुन लॉटरी संचलनालयातल्या अधिकाऱ्यांनी लॉटरीच्या चालकास फायदा दिला.


 

  • सरकारला दरवर्षी मिळणारा 1 हजार 600 कोटींचा महसूल अवघ्या 7 कोटींवर आला. त्यामुळे मोठे नुकसान झाले.


 

  • 2001 ते 2009 मध्ये ऑनलाईन लॉटरीसाठी निविदा मागवताना एकाच अर्जदाराला प्राधान्य दिल्याचा आरोप


 

  • चेन्नईतल्या मे. मार्टिन लॉटरी एजन्सीला ऑनलाईन लॉटरीचे कंत्राट दिले.


 

  • दोन अंकी लॉटरी आहे, असे सांगून प्रत्यक्षात एक अंकी लॉटरी सुरु करुन लॉटरी कायद्याचा भंग केल्याचा दावा


 

  • लॉटरीचे अब्जावधींचे उत्पन्न राज्याच्या तिजोरीत जाण्याऐवजी मार्टिन कंपनीच्या खात्यात जमा झाल्याचा आरोप


 

  • दिवसात एकच सोडत काढण्याचं बंधन असताना दर 15 मिनिटाला एक सोडत काढून नियमांचा भंग करण्यात आला


 

  • नियमाप्रमाणे सोडतीचा सर्व्हर हा राज्यात असणे बंधनकार असताना, मार्टिन कंपनीचा सर्व्हर चेन्नईत होता


 

  • कमी विकलेल्या क्रमांकाच्या तिकिटांचे नंबर सोडतीत काढले जात होते.


 

  • या प्रकरणी पोलिसांनी अहवाल सादर केला, पण तत्कालीन सरकारने गोपनीयतेच्या सबबीखाली दडपून टाकल्याचा दावा


 

  • तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या आशीर्वादानेच घोटाळा झाला आणि तो दाबल्याचाही आरोप




संबंधित बातम्या :

जयंत पाटलांच्या स्पष्टीकरणाला आनंद कुलकर्णींचं उत्तर


लॉटरी घोटाळा : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी आरोप फेटाळाले


आघाडीच्या काळात अब्जावधींचा ‘लॉटरी घोटाळा’?