मुंबई : मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय हा धक्कादायक आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मलाही पटला नाही. पण न्यायालयानं त्यांचा निर्णय दिलाय. आपण या निर्णयावर आत्मचिंतन करणं आवश्यक आहे. काही लोकं राजकीय हेतून कसं केंद्राकडे बोट दाखवता येईल हे पाहात आहेत. राज्याचा कायदा असल्यानं केंद्राचा संबंध नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. काही लोकांना असं वाटतंय की माझी जात ब्राह्मण असल्यामुळं मला टीकेचा धनी करा. मात्र मराठा समाजाला माहीत आहे की मी यासाठी किती प्रयत्न केले आहेत, असंही फडणवीस म्हणाले.


यावेळी फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत मी बेजबाबदार वक्तव्य करणार नाही. सत्ताधाऱ्यांनी संभ्रम करणारी वक्तव्य टाळावीत. काही लोकं राजकीय हेतून कसं केंद्राकडे बोट दाखवता येईल हे पाहात आहेत. राज्याचा कायदा असल्यानं केंद्राचा संबंध नाही. केंद्राला पक्षकार करणं याचिकाकर्त्यांच्या हातात. केंद्राला पक्षकार करुन काही उपयोगही नाही. केंद्राकडं बोट दाखवणं ही पळवाट आहे, असं फडणवीस म्हणाले.

राज्य सरकार अंगावर काही घेत नाही


फडणवीस म्हणाले की, आरक्षणासंदर्भात आपण सगळे निकष पूर्ण केलेत का? हे आपल्याला कोर्टाला सांगायचा आहे. सगळ्यांची एकत्र सुनावणी होत असताना आम्हाला स्थगिती का? हा मुद्दा आपण आता मांडायला हवा. इतर राज्यांप्रमाणे आपलाही कायदा टिकायला हवा. राज्य सरकार अंगावर काही घेत नाही. स्थगिती हटवण्यासाठी राज्य सरकारला प्रयत्न करावे लागतील. अध्यादेशाबाबत विधीतज्ञांसोबत चर्चा केली जाऊ शकते, असंही फडणवीस म्हणाले. कुंभकोणीएवजी थोरांतांकडे केस द्यावी, त्यांनी उच्च न्यायालयात केस जिंकली होती, असं देखील ते म्हणाले.


छत्रपतींमध्ये कुणी वाद लावू नये


मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व कुणी करावं याबाबत फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले की, दोन्ही छत्रपती आमच्यासाठी आदरणीय आहेत. छत्रपतींच्या घराण्यात कुणीही फूट पाडू नये. नेतृत्व दोघांनीही करावं. दोघांमध्ये नेतृत्वासाठी वाद नाही. त्यामुळं कुणी तसा वाद लावू नये, असं फडणवीस म्हणाले.


आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना भरतीचा निर्णय योग्य नाही


छत्रपती संभाजीराजे यांच्या भरतीसंदर्भातील वक्तव्यात वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत सरकारनं भरतीचा निर्णय घेऊ नये. अशा प्रकारचा निर्णय घेताना सर्व घटकांशी चर्चा करावी. राज्याची स्थिती गंभीर असताना असे निर्णय घेताना विचार करावा. भरती करावी मात्र आता घाई नाही. आपण ही स्थगिती हटवू शकतो का यावर विचार केला जावा. एक महिना उशीर झाल्याने काही फरक पडत नाही. याबाबत चर्चा तरी करावी. मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना आता भरतीचा निर्णय योग्य नाही, असं फडणवीस म्हणाले.


मराठा समाजात प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई


मराठा समाजात प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापित अशी एक लढाई आहेच. मराठा समाजातील एक मोठा घटक गरीब आहे, वंचित आहे. मराठा समाजातला एक वर्ग राज्यकर्ता आहे. तो समृद्ध आहे. मात्र दुसरा वर्ग उपेक्षित आहे, त्यांच्या मनात विस्थापित असल्याची भावना आहे. मात्र यासाठी मराठा आमदारांवर खापर फोडणं चुकीचं आहे.


 कांदा निर्यातबंदी लावणं चूक


निर्यातबंदी ज्याक्षणी झाली त्याक्षणी मी केंद्रीय मंत्री गोयल यांना फोन केला. निर्यातबंदीसाठी ही वेळ बरोबर नाही. त्यांनी याबाबत केंद्रानं एक मेकॅनिझम तयार केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र शेतकरी अडचणीत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना निर्यातबंदी लावणं चूक आहे. मी याबाबत केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. यातून काहीतरी योग्य निर्णय घेतला जाईल, असं फडणवीस म्हणाले.



संबंधित बातम्या


मराठा समाजाच्या आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस यांचाही सल्ला घेणार : अशोक चव्हाण


'नानासाहेब फडणवीसांचं बारभाई कारस्थान' पुस्तक कधी येणार?, एकनाथ खडसे म्हणाले...