नांदेड : कोरोना महामारीमुळे बंद पडलेल्या शाळा मोडकळीस आल्या आहेत. शाळेतील विजप्रवाह खंडित झाले असून वर्ग खोल्यांमध्ये घुस व उंदरांची बिळे झाल्यामुळे वर्ग खोल्यात घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे कोरोनामुळे जीव मुठीत धरून बसलेले विद्यार्थी आता मोडकळीस आलेल्या व धोकादायक असलेल्या इमारतीत पुन्हा जीव मुठीत धरून बसत असल्याचे चित्र आहे. ही अवस्था झालीय नांदे जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील लोणी गावच्या जिल्हा परिषद शाळेची.


कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. आज राज्य सरकारच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील कोरोना मुक्त गावातील 8 ते 12 वीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन सरकारने गेली दोन वर्षे शाळांना कुलूप लावले होते. आणि विद्यार्थीही कोरोनामुळे आपला जीव मुठीत धरून घरी बसले होते. परंतु, आज राज्यभरातील कोरोनामुक्त गावातील 8 ते 12 वर्गाच्या सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, शाळा चालू असताना असलेल्या शाळेच्या इमारती आता पूर्वी प्रमाणे राहिल्या नाहीयेत. कारण जिल्ह्यातील अनेक शाळांची गेल्या दोन वर्षांपासून कोणतीही डागडुजी झाली नाहीय. तर कोरोना काळात गुरुजींनी शाळा उघडणे तर सोडा पण साधी चक्करही शाळेकडे मारली नाही. त्यामुळे शाळांच्या वर्ग खोल्यांमध्ये उंदीर, घुस यांची बिळे झाली आहेत. तर अनेक शाळांची छपरे अवकाळी पावसामुळे उडून गेलीयेत तर काही शाळांची छतांची पडझड झालीय. 


याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील लोणी शाळेचे छत कोरोना काळातील देखभाल दुरुस्ती अभावी कोसळलं आहे. लोणी जिल्हा परिषद शाळा कोरोना काळात बंद असल्यामुळे वर्ग खोल्यात जागोजाग उंदीराची बिळे आणि वर्गभर माती जमा झालीय. कोरोना काळात शाळा बंद असताना गुरुजींनी शाळेची देखभाल तर सोडा पण शाळेकडे फिरकूनही पाहिले नाहीये. त्यामुळे शाळेची इमारत, वर्गखोल्या, सौचालय यांची बकाल अवस्था झालीय. आज जरी जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या असल्या तरी शाळा सुरू होण्याअगोदर प्रशासनाकडून शाळांची दुरुस्तीही आवश्यक होती. परंतु, ती जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनामुळे जरी विद्यार्थ्यांचा जीव वाचला असला तरी, धोकादायक इमारतीत बसण्याची वेळ आल्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव पुन्हा धोक्यात आलाय हे मात्र नक्की.