मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त जामीनातून तात्पुरता दिलासा मंजूर केला आहे. भावेच्या वडिलांचं रत्नागिरीत कोरोनामुळे निधन झाल्यानं त्यांच्या अंत्यविधींसाठी तिथं जाण्याची आणि राहत्या शहराबाहेर जाण्याची परवानगी गुरूवारी हायकोर्टानं दिली आहे. डॉ. दाभोलकर यांची हत्या 20 ऑगस्ट 2013 रोजी झाली. आरोपी शरद कळसकरनं सीबीआयला दिलेल्या जबाबानंतर याप्रकरणी अॅड. संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावेला मे 2019 मध्ये अटक केली होती.  


6 मे रोजी मुंबई उच्च न्यायालयानं विक्रम भावेला कठोर अटिशर्तींसह जामीन दिला होता. याप्रकरणी सीबीआयचा तपास अद्याप सुरू आहे. आरोपीविरोधात आरोप निश्चित होणं आणि खटल्याला सुरूवात होणं या गोष्टी नजीकच्या काळात तरी शक्य नाहीत. आणि आरोपीविरोधात नव्यानं साक्षीपुरावे सापडणं आणि नवे आरोप लागणंही शक्य नाही, असा युक्तिवाद बचावपक्षानं हायकोर्टात केला होता, जो ग्राह्य धरला गेला. मागील दोन वर्षापासून सीबीआयच्या केसमध्ये विक्रम भावे अटकेत होता. साल 2013 मध्ये पुण्यात डॉ. दाभोलकर यांची सकाळी मॉर्निंग वॉकदरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सीबीआयनं आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तर या दोघांना घटनास्थळाची रेकी करण्यासाठी आणि गुन्हा केल्यानंतर तिथून फरार होण्यासाठी विक्रम भावेनंच मदत केली होती असा आरोप तपासयंत्रणेनं ठेवला आहे. 


न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानंच भावेला एक लाख रुपयांचा व्यक्तिगत जामीन मंजूर केला होता. मात्र हा जामीन मंजूर करताना पुढील एक महिना दररोज तपास अधिका-यांपुढे हजेरी, त्यानंतर पुढचे दोन महिने एक दिवसाआड हजेरी लावणं अनिवार्य राहील. तसेच खटल्याला नियमित हजेरी लावणं, साक्षी पुरावे प्रभावित न करणं, कोणतेही गैरक्रृत्य न करणं आणि पुणे सत्र न्यायालयाच्या कार्यक्षेत्राबाहेर जाण्यास मनाई केली आहे. यापैकी एकही अट मोडल्यास जामीन रद्द करण्यात येईल असंही हायकोर्टानं आपल्या निकालात स्पष्ट केलं आहे. त्यामुळे वडिलांच्या निधनानंतर रत्नागिरीला जाण्यासाठी विक्रम भावेनं हायकोर्टाकडे परवानगी मागत अर्ज दाखल केला होता जो कोर्टानं स्वीकारला आहे.


कोण आहे विक्रम भावे 


हिंदू विधिज्ञ परिषदेत माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम पाहणारा अशी विक्रम भावेची मूळ ओळख आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणी सीबीआयनं सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि हिंदू जनजागृती समितीचे सदस्य वीरेंद्र तावडे यांची चौकशी केली होती. ज्यातून विक्रम भावेला अटक करण्यात आली होती. डॉ. दाभोलकर हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप विक्रम भावेवर असून दाभोलकरांची ओळख पटवण्यात विक्रम भावेचा सहभाग होता. तसेच दाभोळकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तूल नष्ट करण्यातही भावेनंच मदत केल्याचा आरोपावरून त्याला अटक झाली होती. याआधी ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि पनवेलमधील थिएटरमध्ये 4 जून 2008 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी विक्रम भावेला दोषी ठरवण्यात आलं होतं. ज्यात त्याला 10 वर्षांची शिक्षाही झाली आहे. मात्र मधल्या काळात त्याची जामिनावर सुटका झाली असताना तो या कटात सामील झाला.