मुंबई : अवघ्या काही महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election 2024) बिगुल वाजणार आहे. त्याआधी जागावाटपाच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजलीये. कारण महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपासंदर्भात अद्यापही कोणता ठोस निर्णय झालेला नाही. त्यातच शिवसेना (Shiv Sena) आण राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्या आमदार अपात्रतेचा निर्णय अद्यापही प्रलंबितच आहे. त्यामुळे आधी आमदार अपात्रतेवर निर्णय होईल आणि त्यानंतरच महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा निर्णय घेतला जाणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. 


 शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर 10 जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्ष निकाल देण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यानंतर काँग्रेसची  bargaining power आणखी वाढेल. म्हणूनच काँग्रेसकडून महाराष्ट्रातील जागावाटप लांबवले जात आहे का, अशा देखील चर्चा सुरु आहे.  राष्ट्रवादी आणि शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीत दोन ही पक्षांची बारगेनिंग पॉवर कमी झाली. त्यामुळे आमदार अपात्रतेचा निकाल आल्यानंतर काँग्रेस जागावाटपावर निर्णय घेण्याच्या भूमिकेत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 


काँग्रेसच्या हायकमांडकडे महाराष्ट्रातील किती जागांसाठी आग्रह?


विदर्भ - 8 ते 10 
पश्चिम महाराष्ट्र - 4
मुंबई - 3
मराठवाडा - 4
उत्तर महाराष्ट्र - 3 ते 4


या जागांसाठी जरी काँग्रेस आर्ही असला तरीही महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरती अजूनही निर्णय झालेला नाही. आमची चर्चा सुरु असून अंतिम बैठक लवकरच होऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचा दावा तिनही पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात येतोय. त्यामुळे आमदार अपात्रतेच्या निर्णयावर राज्याच्या राजकारणाची अनेक समीकरणं अवलंबून असणार आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून जागावाटपाच्या संदर्भात सावध भूमिका घेतली जात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. 


पण हायकमांड अंतिम निर्णय घेणार?


काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय हा दिल्लीतच होणार असल्याचं म्हटलं. दिल्लीत काँग्रेस हायकमांडसोबत चर्चा करुनच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं. पण तरीही काँग्रेस हाय कमांडचं राज्यातील काँग्रेस नेत्यांशी बोलल्याशिवाय पानही हलत नाही, असं म्हटलं जातं. 


काँग्रेसकडून चाचपणी सुरु


काँग्रेस हायकमांडकडून राज्यातील लोकसभा निवडणुकांसाठी इच्छुकांची यादी मागवली असून 10 जानेवारीपर्यंत यादी देण्याचे निर्देश देण्यात आलेत, अशी माहिती काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी दिली.  महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्मुला अंतिम टप्प्यात आहे, असे असले, तरी काँग्रेसने राज्यातील सर्वच मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी असो अथवा अन्य मित्र पक्षांच्या जागांचा प्रश्न काँग्रेस स्वत:ची तयारी आत्मविश्वासान करत असल्याचं म्हटलं जातंय. 


 शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आपला वाटा आणि भुमिका मोठी असणारे, हे काँग्रेसनं ठरवलंय.  फक्त इतर मित्र पक्षासोबतची मैत्री टिकवण्यात काँग्रेसला यश येणार का, हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरेल. 


हेही वाचा : 


मी फक्त ढकललं, मारहाण केलीच नाही; व्हायरल व्हिडीओवर भाजप आमदार सुनील कांबळेंचं स्पष्टीकरण