नवी मुंबई : पनवेलमधील देवेद आणि सुकापूरमध्ये शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारासाठी पैसे वाटप करणाऱ्या दोन कार्यकर्त्यांना खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. निवडणूक भरारी पथकाच्या फिर्यादीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
प्रताप रामचंद्र आरेकर असं सुकापूरमध्ये अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. प्रतापची झडती घेतली असता त्याच्याकडे मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांच्या नावाच्या 78 कोऱ्या व मतदारांच्या चिट्ठ्या सापडल्या. याशिवाय 5800 रुपयांची रोख रक्कम असलेले 29 खाकी पाकिटंही सापडले.
प्रत्येक लिफाफ्यात 200 रुपयांच्या नोटा असल्याचं आढळून आलं. याशिवाय त्याच्याकडे एक लाल रंगाची पिशवी होती, त्यामध्ये 178 पानी रजिस्टर व त्यात साक्षी पार्क, जन्मोत्री, गोकुळधाम सोसायटी, श्रीनिकेतन, तपोवन, मातोश्री, साईकृपा, स्वर्णभूमी, सुंदरम सोसायटी अशी नावे व सदस्यांची नावे आढळली.
तर देवेदमध्ये संजय पाटीलला अटक करण्यात आली आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मावळ मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या नावाच्या 23 मतदारांच्या चिट्ठ्या सापडल्या. त्याच्याकडे 2 हजार रुपयांच्या 3 नोटा, 500 रुपयांच्या 22 नोटा, 200 रुपयांच्या 5 नोटा, 100 रुपये दाराच्या 81 नोटा, तसेच रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल-भाजप सरकार कामगिरी असे लिहिलेले नोटबुक सापडले.
दोघांविरोधातही मतदारांना पैशाचे आमिष दाखविले या कारणासाठी खांदेश्वर पोलिसांनी कलम 171 (इ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. काल देखील कामोठे येथे पैसे वाटप करणाऱ्या दोन कार्यकर्त्यांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे.