रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोलमधील अंदाज काहीही असले तरी आपण विजयी होणार असल्याचा विश्वास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे व्यक्त केला आहे. लोकांच्या मनातील एक्झिट पोल हा निलेश राणे आहे, असं त्यांना म्हटलं.


देशात आणि राज्यात माध्यमे जे काही दाखवत आहेत ते एक्झिट पोल तसेच राहणार नाहीत. निकाल एक्झिट पोलपेक्षा नक्कीच वेगळे लागतील. प्रचार करताना कोणाची लाट दिसली नाही, असं विधान निलेश राणेंनी केलं. शिवसेनेबद्दल लोकांच्या मनात प्रचंड नाराजी आहे. स्थानिक पातळीवर उद्धव ठाकरेंची भूमिका काय आहे? तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्यात गेल्या 25 वर्षात शिवसेनेने केलं काय? असा सवाल निलेश राणेंनी उपस्थित केला. याठिकाणी जे काही केलं ते आम्ही करून दाखवलं. शिवसेनेचे आमदार, खासदार बोगस आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.


उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी भूमिका बदलल्या. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दलही या मतदारसंघात प्रचंड नाराजी आहे. शिवसेनेने या मतदारसंघात काहीही विकासकामे केली नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही, असं निलेश राणेंनी म्हटलं.


शिवसेनेने रत्नागिरी-सिंधुदुर्गात काहीही न केल्याने लोकांनीही आता ठरवलं आहे. जो काही अंडरकरंट आहे तो माझ्या फेवरचा आहे, ते मला प्रचारात दिसलं. त्यामुळे विजय पक्का असल्याचा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला आहे.