यातच एबीपी माझ्या विशेष 'डायरी'मध्ये देखील महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचे अंदाज आले आहेत. यामध्ये मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांचा समावेश आहे. यातली काही नेत्यांनी आपल्याच पक्षाला मोठा आकडा मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर अनेकांनी तटस्थपणे आपला अंदाज व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मते भाजपला 36 ते 42 जागा मिळणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेला 36 ते 42 जागा मिळणार आहेत. तर काँग्रेस राष्ट्रवादीला 6 ते 12 जागा मिळणार असल्याचा त्यांचा अंदाज आहे. त्यांनी 8 एप्रिल 2019 रोजी एबीपी माझाच्या डायरीत आपला अंदाज नोंद केला होता.
दानवे म्हणतात भाजप-शिवसेनेला 45 जागा मिळणार
भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे हे एनडीएच्या बाबतीत अधिक आशावादी आहेत. त्यांच्या अंदाजानुसार शिवसेना-भाजपला 45 तर काँग्रेस राष्ट्रवादीला केवळ तीनच जागा मिळणार आहेत. 30 मार्च 2019 रोजी त्यांनी आपला अंदाज एबीपी माझाच्या डायरीत नोंद केला होता.
सुधीर मुनगंटीवारांच्या मते एनडीएला 35 ते 38 जागा मिळणार
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेला 35 ते 38 जागा मिळणार आहेत. तर काँग्रेस राष्ट्रवादीला 10 ते 13 जागा मिळणार असल्याचा त्यांचा अंदाज आहे. त्यांनी 13 मार्च 2019 रोजी एबीपी माझाच्या डायरीत आपला अंदाज नोंद केला होता.
संकटमोटक गिरीश महाजनांच्या मते शिवसेना-भाजपला 40 जागा
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेला 40 जागा मिळणार आहेत. तर काँग्रेस राष्ट्रवादीला 8 जागा मिळणार असल्याचा त्यांचा अंदाज आहे. त्यांनी 13 मार्च 2019 रोजी एबीपी माझाच्या डायरीत आपला अंदाज नोंद केला होता.
पंकजा मुंडेंच्या मते शिवसेना-भाजपला 36 ते 42 जागा
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मतेमहाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेला 36 ते 42 जागा मिळणार आहेत. तर काँग्रेस राष्ट्रवादीला 6 ते 12 जागा मिळणार असल्याचा त्यांचा अंदाज आहे. मराठवाड्यातील 8 पैकी 6 जागा भाजप शिवसेनेला मिळतील, असा त्यांचा दावा आहे. त्यांनी 22 एप्रिल 2019 रोजी एबीपी माझाच्या डायरीत आपला अंदाज नोंद केला होता.
विनोद तावडेंच्या मते शिवसेना-भाजपला 35 ते 39 जागा
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या मते महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेला 35 ते 39 जागा मिळणार आहेत. तर काँग्रेस राष्ट्रवादीला 9 ते 13 जागा मिळणार असल्याचा त्यांचा अंदाज आहे. त्यांनी 26 मार्च 2019 रोजी एबीपी माझाच्या डायरीत आपला अंदाज नोंद केला होता.
संजय राऊत यांच्या मते शिवसेना-भाजपला 25 ते 32 जागा
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या मते महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेला 25 ते 32 जागा मिळणार आहेत. तर काँग्रेस राष्ट्रवादीला 15 ते 22 जागा मिळणार असल्याचा त्यांचा अंदाज आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे देखील विजयी होतील, असाही त्यांचा दावा आहे. त्यांनी 22 मार्च 2019 रोजी एबीपी माझाच्या डायरीत आपला अंदाज नोंद केला होता.
महाराष्ट्रात आताच्या घडीला अंदाज देणे अवघड : अजित पवार
महाराष्ट्रात आताच्या घडीला अंदाज देणे अवघड आहे. अजून काही वेळ मिळाला पाहिजे. अजूनही लोक नक्की काय मनात आहे हे सांगत नाहीत, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यांनी 12 एप्रिल 2019 रोजी एबीपी माझाच्या डायरीत आपलं हे मत नोंद केलं होतं.
सुप्रिया सुळेंच्या मते राष्ट्रवादी-काँग्रेसला 18 जागा
राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंच्या मते राष्ट्रवादी-काँग्रेसला 18 जागा मिळणार आहेत. त्यांच्या मते महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेला 30 जागा मिळणार आहेत. त्यांनी 10 मार्च 2019 रोजी एबीपी माझाच्या डायरीत आपला अंदाज नोंद केला होता.
प्रफुल्ल पटेलांच्या मते राष्ट्रवादी-काँग्रेसला 25 जागा
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मते राष्ट्रवादी-काँग्रेसला 25 जागा मिळणार आहेत. त्यांच्या मते महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेला 23 जागा मिळणार आहेत. त्यांनी 19 मार्च 2019 रोजी एबीपी माझाच्या डायरीत आपला अंदाज नोंद केला होता.
धनंजय मुंडे यांच्या मते 50-50 जागा
राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी 50-50 जागा युती आणि आघाडीला दिल्या आहेत. त्यांच्या मते राष्ट्रवादी-काँग्रेसला 23 ते 25 जागा मिळणार आहेत. तसेच भाजप आणि शिवसेनेला 23 ते 25 जागा मिळणार आहेत. त्यांनी 19 मार्च 2019 रोजी एबीपी माझाच्या डायरीत आपला अंदाज नोंद केला होता.
जानकरांच्या मते राष्ट्रवादी-काँग्रेसला केवळ 5 जागा
दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसला केवळ 5 जागा मिळणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेला 42 जागा मिळणार आहेत. त्यांनी 24 एप्रिल 2019 रोजी एबीपी माझाच्या डायरीत आपला अंदाज नोंद केला होता.
काँग्रेस नेते राजीव सातवांच्या मते काँग्रेस-राष्ट्रवादीला 20 जागा
काँग्रेस नेते राजीव सातवांच्या मते काँग्रेस-राष्ट्रवादीला 20 जागा मिळणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेला 28 जागा मिळणार आहेत. त्यांनी 25 एप्रिल 2019 रोजी एबीपी माझाच्या डायरीत आपला अंदाज नोंद केला होता.
एबीपी माझा आणि नेल्सनच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार एनडीएची सत्ता येणार असल्याचा अंदाज
एबीपी माझा आणि नेल्सनच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार नरेंद्र मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसणार असल्याचं दिसतं आहे. एबीपी-नेल्सनप्रमाणेच इतर संस्थांच्या एक्झिट पोलनुसार भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं चित्र दिसत आहे. एनडीएला 277 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यापैकी एकट्या भाजपच्या वाट्याला 227 जागा येणार असल्याचं भाकित पोलमध्ये वर्तवण्यात आलं आहे. तर यूपीएला 130च्या दरम्यान जागा मिळणार असल्याचं पोलची आकडेवारी सांगते. या पोलनुसार लोकसभा 2019 च्या निकालात एनडीएला 277, यूपीए 130, इतरांना 135 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. या एक्झिट पोलमध्ये 543 लोकसभा मतदारसंघांपैकी 542 मतदारसंघांचा अंदाज सांगितला आहे. तामिळनाडूच्या एका जागेवर निवडणूक आयोगाने निवडणूक रद्द केली होती.
लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यासाठी काही तास शिल्लक आहेत. मात्र अंतिम निकाल येण्यासाठी शुक्रवारची पहाट उजाडण्याची शक्यता आहे. व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लिप मोजणीसाठी हा अतिरिक्त वेळ लागणार आहे. त्यामुळे निकालासाठी रात्री दोन वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत जय-पराजयाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. देशभरातील 543 पैकी 542 मतदारसंघाच्या मतमोजणीला 23 मे रोजी सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. अर्ध्या तासानंतरच कल हाती येण्यात सुरुवात होईल. त्यानंतर कोणता पक्ष जिंकणार, कोणता पक्ष सरकार स्थापन करणार हे स्पष्ट होईल.