Hingoli Loksabha Election 2024 : राज्यातील आठ मंतदारसंघासह आज हिंगोली (Hingoli) लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्या अनुषंगाने सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले होते. तर आता मतदानाची वेळ जवळ जवळ संपली असली तरी हिंगोली शहरातील जिल्हा परिषद शाळा आजम कॉलनी येथील मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. या मतदान केंद्रावर 1455 इतक्या मतदारांची नोंदणी असून आत्तापर्यंत फक्त 800 मतदारांचे मतदान झालं आहे. दुपारी तापमान मोठ्या प्रमाणात वाढल्याने शहरातील बहुतांश मतदान केंद्रांवर शुकशुकाट बघायला मिळाला.


तर, संध्याकाळी उष्णतेच्या पारा घटल्याने मतदारांनी मतदान करण्यासाठी एकच गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, या मतदान केंद्रामध्ये फक्त एकच मशीन असल्याने मतदान केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने मतदान केंद्र परिसरामध्ये रांगेत असलेल्या मतदारांना टोकन देण्यात आले  आहे. तसेच सर्व मतदारांचे मतदान करून घेतले जाईल, अशी सुद्धा माहिती हाती आली आहे. 


अखेरच्या टप्प्यात मतदान केंद्रावर मोठी रिघ


अठराव्या लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याच्या आठ मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली होती. देशभरातील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 88 जागांसाठी  मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून अनेक उमेदवारांचे भवितव्य आता मतदानपेटीत  कैद झाले आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, नांदेड, हिंगोली आणि परभणी या आठ मतदारसंघात आज मतदानाचा रणसंग्राम रंगला आहे. अशातच या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील आठ मतदारसंघात सरासरी 53.51 टक्के मतदान झाले आहे. जे की देशातील सर्वात कमी टक्के मतदान असल्याचेही समोर आले आहे.


राज्यात आतापर्यंत सर्वाधिक मतदान हे वर्धा मतदारसंघात 56.66 टक्के तर सर्वात कमी हिंगोली लोकसभा मतदारसंघात 52.03 टक्के इतके मतदान झाले आहे. असे असले तरी बहुतांश मतदान केंद्रावरी मतदार यादीतील घोळ, वाढते तापमन आणि इतर कारणास्तव मतदार अपेक्षे प्रमाणे मतदान केंद्रापर्यंत न आल्याचे बघायला मिळाले. तर दुसरीकडे उष्णतेचा पारा कमी होताच मतदारांनी मतदान केंद्रावर एकाच झुंबड केल्याचे बघायला मिळत आहे. हिंगोली शहरातील आजम कॉलनी परिसरातील जिल्हा परिषद शाळा येथील मतदान केंद्रावर शेवटच्या टप्प्यात मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी, या साऱ्यांना आता टोकन देऊन त्यांचे मतदान ग्राह्य धरल्या जाईल, अशी सुद्धा माहिती पुढे आली आहे. 


आधी मतदान, नंतरच वडिलांवर अंत्यसंस्कार


मनात दुःख, डोळ्यात आसवं, तरी राष्ट्रीय कर्तव्याला सर्वस्वी मानत आपल्या मतदानाचे कर्तव्य पार पाडत एका कुटुंबाने नवा आदर्श निर्माण केला आहे. घरात ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यु तरी कुटुंबातील सर्व जण मतदान केंद्रावर दाखल होत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. हा सर्व प्रकार घडला आहे तो अकोला शहरातल्या न्यू तापडीया नगर येथे. 


दरम्यान, न्यू तापड़िया नगर इथं पिल्लै कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती रांचचंद्र दुर्गय्या पिल्लै यांचं आज 26 एप्रिल रोजी सकाळी वयाच्या 88 व्या वर्षी दुःखद निधन झाले. असे असताना कुटुंबियांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. घरात वडिलांचा पार्थिव, त्यात दूसरीकड़ं मतदानाचं कर्तव्य. अशा दुःखद परिस्थितीत दिनेश पिल्लै यांनी आधी मतदान नंतरचं वडिलांवर अंत्यसंस्कार, असा निश्चय केला. त्यानंतर दिनेश पिल्लैसह कुटुंबातील सर्वांनी राष्ट्रीय कर्तव्य बजावलं. इतक्या दुःखाच्या क्षणातही त्यांनी मतदान केंद्र गाठत आपलं मतदान केलं. अशा प्रकारे दिनेश पिल्लै यांनी आदर्श घडवला असून सर्वत्र त्यांचं कौतूक होतंय.


इतर महत्वाच्या बातम्या