Amravati News अमरावती : लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) निकालानंतर देशासह राज्यात भाजप आणि महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश न आल्याचे बघायला मिळाले आहे. अशातच राज्यात बहूचर्चित असलेल्या अमरावती मतदारसंघात देखील महायुतीतील (Mahayuti) भाजपच्या (BJP) उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांना त्यांच्या दारुण पराभवाला समोर जावे लागले आहे. या पराभवाची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो.  तसेच पराभवाची कारणे शोधण्यासाठी आम्ही विश्लेषण सुरू केले असून पुढे आत्मचिंतन करू, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी बोलताना व्यक्त केली आहे.


अमरावती येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी ही माहिती दिली आहे. निवडणूक काळात आपल्याच लोकांनी आपला घात केला. तसेच सगळ्यांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या, असा आरोपही रवी राणा यांनी कुणाचे नाव न घेता यावेळी केलाय. मात्र त्यांचा रोख राष्‍ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्‍यक्ष संजय खोडके यांच्याकडे तर नाही ना, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.


सगळ्यांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या- रवी राणा


भाजप नेत्यांनी आपआपल्या परीने सगळ्यांनी काम केलेत, त्यांचे आभार मानतो. तसेच काहीनी आपल्या राजकीय पोळ्या देखील भाजून घेतल्या आहेत. महायुतीमध्ये बच्चू कडू नव्हते. मात्र, आता लोकं खोके, वसुली, हा सगळा हिशोब मागणार आहे. चोऱ्या करणे, वसुली करणे, पैसे घेऊन राजकारण करणे इत्यादिसह मला काय काय मागणी झाली, प्रहारचा उमेदवार कसा उभा केला, कुठून वसुली केली, याचे सगळं हिशोब माझ्याकडे आहे. पुढे अमरावतीत मुस्लिम समाजाचा आमदार होईल अशी स्थिती आहे. या तोडीबाजाचा हिशोब अचलपूरची जनता घेईल. असा इशाराही आमदार रवी राणा यांनी प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना देत हे आरोप केले आहेत. 


मी स्वत: युवा स्वाभिमान पार्टीकडून विधानसभा लढणार 


निवडणुकांमध्ये विजयी झालेले खासदार बळवंत वानखडे यांना मी शुभेच्छा देतो. विकासासाठी जिथे नवनीत राणा यांची गरज लागेल, तिथे त्या आणि मी स्वतः पूर्ण ताकदीने उभं राहू. रवी राणा कायम युवा स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना मागील 15 वर्षांपासून पाठिंबा दिलेला आहे आणि विधानसभेत मी स्वत: युवा स्वाभिमान पार्टीकडून उभा राहणार असल्याची घोषणाही आमदार रवी राणा यांनी केलीय. 


इतर महत्वाच्या बातम्या