Nagpur Lok Sabha Election : ईव्हीएमच्या (EVM) माध्यमातून देशाला पुन्हा गुलाम बनवण्याचे प्रयत्न होत असून तुम्ही गुलाम होता आणि पुन्हा गुलामच होणार अशी तीव्र शब्दात टीका काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी केली. इंडिया विरुद्ध ईव्हीएमच्या (Congress On EVM) मोहिमेला त्यांनी पाठिंबा दर्शवला असून नागपूर आणि रामटेक या दोन्ही लोकसभा मतदारसंघात चारशे-चारशे उमेदवार उभे करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. इंडिया विरुद्ध ईव्हीएम या मोहिमेतील कार्यकर्त्यांनी ईव्हीएमवर निवडणूक न घेता बॅलेट पेपरवर घ्यावी, अन्यथा प्रत्येक मतदारसंघात चारशे उमेदवार उभे करून प्रशासनाला निवडणूक ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यासाठी भाग पाडू, असा इशारा दिला होता.


विशेष म्हणजे काँग्रेसचे विदर्भातील दिग्गज नेते आणि माजी आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांनीही इंडिया विरुद्ध ईव्हीएमच्या या मोहिमेला पाठिंबा देत ईव्हीएम वर निवडणुका घेणे म्हणजे मतदाराला धोका देणे असल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात खरंच 400 - 400 उमेदवार उभे करून निवडणुकीची प्रक्रिया ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्यावी लागण्याची स्थिती निर्माण केली जाईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


गुलाम होता आणि गुलामच राहणार


ईव्हीएम म्हणजे गुलामीचे दर्शन घडवणारी त्यांची कुवत आहे. मी या देशाला पुन्हा एकदा आठवण करून देतो की तुम्ही गुलाम होता आणि गुलामच होतं राहणार आहे. तुमच्या रक्तात गुलामीचे जे जीन्स आहे ते पुन्हा बाहेर आणल्या जात आहे. निवडणूक आयोग एखाद्या राजकीय पक्षाला भेटत नाही. लोकं वारंवार ईव्हीएम विरोधात तक्रारी करत आहेत. त्यामुळे इंडिया विरुद्ध ईव्हीएम मोहिमेला मराठवाड्यातून देखील पाठिंबा मिळत आहे. तर विदर्भात आम्ही  या विरुद्ध लढा देत आहोत. हा लढा आपल्या देशासाठी असून यात प्रत्येकाने सहभागी होऊन या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन देखील सुनील केदार यांनी केले आहे. 


प्रत्येक मतदारसंघात  400 उमेदवार


आगामी निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करून निवडणूक न घेता बॅलेट पेपरवर घ्यावी, अन्यथा प्रत्येक मतदारसंघात चारशे उमेदवार उभे करून प्रशासनाला निवडणूक ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यासाठी भाग पाडू. असा इशारा इंडिया अगेंस्ट ईव्हीएमच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. ईव्हीएमच्या वापराबाबत अनेक तक्रारी येत असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची वारंवार मागणी केली जात आहे. यासाठी देशभरात अनेक आंदोलन केले. मात्र आयोगाने त्याची दखल घेतलेली नाही. तसेच ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यावर नागरिकांना आता विश्वास राहिलेला नाही.


परिणामी, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय सुद्धा यावर ठोस भूमिका घेताना दिसत नाही. यामुळे रामटेक आणि नागपूर लोकसभा मतदार संघात प्रत्येकी 400 उमेदवार उभे केल्यास ईव्हीएम काम करणार नाही. पर्यायाने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील, असाही दावा या संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. अशातच या मागणीला आता काँग्रेसकडून देखील पाठिंबा मिळताना दिसत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या