मुंबई : महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याची तयारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दर्शवली आहे. लॉकडाऊनसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची तयारी दाखवली. तसंच याबाबत केंद्र सरकारने यासाठी मदत करावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली. या बैठकीला पंतप्रधानांसह सर्व मुख्यमंत्री मास्क लावून उपस्थित आहेत. मुख्यमंत्री 'वर्षा' निवासस्थानाहून बैठकीला सहभागी होते. त्यांच्यासोबत गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित आहेत.


महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला. लॉकडाऊनचा आज अठरावा दिवस आहे. 14 एप्रिल रोजी हा लॉकडाऊन संपणार आहे. परंतु सध्याची देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.


तर दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही लॉकडाऊन वाढवण्याच्या मागणीला दुजोरा दिला. परंतु लॉकडाऊन संपूर्ण देशात वाढवला पाहिजे, एखाद्या राज्यातून लॉकडाऊन हटवणं आणि एखाद्या राज्यात उठवणं योग्य नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.


घाईत लॉकडाऊन हटवल्यास घातक परिणाम : डब्लूएचओ
डब्लूएचओचे प्रमुख टेड्रोस एडहानोम यांनी जिनिवामधील पत्रकार परिषदेत म्हटलं की, "लॉकडाऊन हटवावं अशी सगळ्यांसारखीच आमचीही इच्छा आहे. परंतु घाईने लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतला तर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होती. जर आपण योग्य पद्धतीने कोरोना व्हायरसचा सामना केला नाही तर त्याचे घातक परिणाम होतील."