Eknath Khadse :  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Elections)  पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. गाठी भेटी दौरे सुरु केले आहेत. काही भागात महायुती एकत्र लढत आहे तर काही ठिकाणी स्वतंत्र लढणार असल्याची भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर महाविका आघाडी देखील काही ठिकाणी एकत्र आणि काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मुक्ताईनगर शहरात आपल्या पक्षाची ताकद कमी असल्याने, वेळ पडली तर, आम्ही या ठिकाणी निवडणुका लढवणार नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते  एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. त्यांचं हे वक्तव्य राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनले आहे.

Continues below advertisement

मुक्ताईनगर शहरामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद कमी 

मुक्ताईनगर  तालुका हा एकनाथ खडसे यांचा बालेकिला मानला जातो. मात्र याच बालेकिल्ल्यात मुक्ताईनगर शहरामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद कमी असल्याची कबुली एकनाथ खडसे यांनी   दिली आहे. ग्रामीण भागात राष्ट्रवादी पक्षाची ताकद असली तरी मुक्ताई नगर शहरात आमचे कार्यकर्ते कमजोर आहेl. पूर्वी पासूनच या ठिकाणी अशी परिस्थिती असल्याचं सांगत, पंचायत समिती निवडणुकीत, निवडून येतील अशाच केवळ चार ते पाच जागा लढवण्याच्या विचार करत आहोत असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. मात्र, वेळ पडली तर त्याही जागा आम्ही लढवणार नसल्याचे सांगत, एकनाथ खडसे यांनी मुक्ताई नगर शहरात नगरपालिका निवडणुकीत माघारीचे संकेत दिल्याने, राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

ज्याच्याकडे पैसा आहे त्याला त्यात यशही देखील मिळू लागलंय

निवडणुकीत लोकं पैसे घेतात आणि मतं जिथं मारायची तिथेचं मारतात, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्याच्या स्थितीमध्ये निवडणुकांचा कल जो आहे तो बदलला आहे. गेल्या 40 ते 45 वर्षापासून मी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आहे आणि पाहिले आहे. माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवावरून निवडणुकांसाठी फारसा पैसा काही खर्च केला जात नव्हता. पण 2019 नंतर जर बघितलं तर निवडणुकीमध्ये पैशांचा महापूर वाहू लागला आहे आणि त्यामुळे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला त्यात यशही देखील मिळू लागलं. त्यामुळं काही ठिकाणी दुर्दैवाने मतदाराही प्रलोभनाला बळी पडत आहे असं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे ज्याच्याकडे पैसा आहे त्याचं पारडं जड होत असताना दिसत आहे. त्यामुळे पूर्वी आमदारकीच्या निवडणुकी ह्या लाख दोन लाखात व्हायच्या. त्या कलाखंडामध्ये जास्तीत जास्त 15 लाखापर्यंत आमच्या निवडणुका पार पडायच्या पण विधानसभेला आता मात्र 15 कोटी देखील कमी पडतील असे चित्र आहे तसंच नगरपालिकेलाही तेवढाच पैसा खर्च होतो. त्यामुळे हे दृष्ट चक्र आहे असं खडसे म्हणाले. 

Continues below advertisement