कर्जमाफी प्रक्रियेसाठी आणखी एक महिना लागणार?
एबीपी माझा वेब टीम | 15 Jan 2018 11:01 PM (IST)
बँकांकडून उपलब्ध करण्यात आलेल्या चुकीच्या यादीचा कर्जमाफीला फटका बसला असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई : शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी किमान एक महिना लागण्याची शक्यता आहे. सहकार विभागाकडून शेतकऱ्यांच्या यादी पडताळणीसाठी तालुका स्तरावर समित्या नेमण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सरकारकडची आणि बँकांकडची यादी पडताळणी करण्यासाठी आणखी एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. बँकांकडून उपलब्ध करण्यात आलेल्या चुकीच्या यादीचा कर्जमाफीला फटका बसला असल्याचं सांगण्यात येत आहे. आत्तापर्यंत 30 लाख शेतकऱ्यांची प्रत्यक्षात कर्जमाफी झाली असून यासाठी एकूण 12 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या यादीचा आकडा 55 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 24 जून 2017 ला राज्य सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली होती.